छत्रपती संभाजीनगर : वेरूळ-अजिंठा महोत्सवाची गेल्या वर्षीच्या खर्चाची उधारी अद्यापपर्यंत फिटलेली नाही. त्यातच यंदाच्या महोत्सवाची तारीखही ठरलेली नाही. डॉ. बा. आं. म. विद्यापीठ परिसरातील ऐतिहासिक सोनेरी महलऐवजी इतरत्र जागेचा शोधही महोत्सवासाठी झालेला नाही. या कारणांमुळे यंदाचा महोत्सव होण्याची शक्यता सध्या तरी धूसर असल्याचे दिसते आहे.
महोत्सवामुळे सोनेरी महलला क्षती पोहोचत असल्यामुळे एका याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने तेथे महोत्सव आयोजित करण्यास मनाई केली आहे. तसेच राज्य पुरातत्व विभागाने सोनेरी महलच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. परिणामी, महोत्सव घेण्यासाठी प्रशासनाला दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. गेल्या महोत्सवाचे विद्युत रोषणाई, स्टेज डेकोरेशन आणि इतर बाबींची तब्बल पावणे दोन कोटींची बिले अद्यापही थकीत असल्याचे वृत्त आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी डीपीसीतून १ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याला शासनाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे पावणे दोन कोटींची बिले रखडली. मागील महोत्सवाची उधारी देणे बाकी असताना यंदाचा महोत्सव कसा भरवावा, असा प्रश्न आहे. प्रशासकीय पातळीवर अद्याप काहीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या महोत्सवावर अनिश्चिततेचे सावट आहे.
अनास्था असल्यामुळे हे घडतंयपर्यटनवृद्धीसाठी हा महोत्सव घेण्यात येतो. परंतु मागील काही वर्षांपासून पर्यटनाशी संबंध नसणाऱ्या अनेकांचा शिरकाव महोत्सव आयोजनात झाला आहे. भंपकपणा करण्यात येत असून, खर्च वाढतो आहे. नेटके नियोजन केल्यास हा महोत्सव चांगला होईल. किमान तीन वर्षांच्या तारखा नियोजित करणे गरजेचे आहे. तसे केल्यास देश-विदेशातील पर्यटक येण्याचे प्रमाण वाढेल. मागील वर्षीच्या आयोजनातील उधारी बाकी आहे.-जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन