औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये आज झालेल्या लिलावात बाजरीला उच्चांकी भाव मिळाला. खाडेगाव (कचनेर ) येथील शेतकरी भरत हुल्सार यांच्या बाजरीची २४७५ रु प्रती क्विंटल अशा भावाने खरेदी करण्यात आली.
आवक घटल्याने बाजरीने मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे. जाधववाडी येथे मागील आठवड्यात परराज्यातील बाजरीला विक्रमी भाव मिळाला होता. विशेषत: उत्तर प्रदेश व राजस्थानमधून येणाऱ्या बाजरीला २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. हा भाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा जास्त आहे. आज या उच्चांकी भावालासुद्धा मात देत स्थानिक बाजरीने २४७५ रुपयांचा पल्ला गाठला आहे.
आजवरचा सर्वात जास्त भाव भरत हुल्सार यांनी त्यांच्या एक एकर शेतीत बाजरी लावली होती. यातून त्यांना २१ गोण्या इतके बाजरीचे उत्पादन मिळाले. बाजरीला कमी पाणी लागत असल्याने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्येही बाजरीचे उत्पादन चागंले आहे. बाजरीस मिळालेला हा भाव आजवरचा सर्वात जास्त असल्याचे हुल्सार यांनी सांगितले.
स्थानिक बाजरीला मागणी पावसाने ओढ दिल्याने बाजरीची वाढ खुंटली, तसेच राज्यात अनेक भागांत पिके जळाली. काही ठिकाणी बाजरीवर बुरशीअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात ४० ते ६० टक्क्यापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे. औरंगाबादेत उत्तर प्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होते, मात्र ही बाजरी बारीक व कमी प्रमाणात हिरवी असते, या उलट स्थानिक बाजरी मोठी व हिरवी असते यामुळे या बाजरीला मागणी असते अशी माहिती जाधववाडीतील व्यापारी गजानन बाळकृष्ण यांनी दिली.
हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला पूर्वी बाजरी ही गरिबांची समजली जायची. आता विशेषत: हिवाळ्यात गव्हापेक्षा बाजरी व ज्वारी खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे आता केंद्र सरकारने ज्वारी व बाजरीचा पोषक तृणधान्यामध्ये समावेश केला आहे, तसेच ज्वारीच्या हमीभावात ७३० रुपयांनी वाढ करून २४५० रुपये, तर बाजरीच्या हमीभावात ५२५ वाढ करून १९५० रुपये प्रतिक्विंटल केला आहे.