प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : एककाळ असा होता की, गूळ खाणारे गरीब व साखर खाणारे श्रीमंत असे समजले जात होते. मात्र, आता साखरेच्या
अतिवापरा दुष्परिणाम समोर आल्याने आता अनेकांचा गुळाचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे. चहापासून ते पुरणपोळीपर्यंत गुळाचा वापर होऊ लागला आहे. यामुळे पुन्हा गुळाला भाव चढला आहे.
बाजारात एका किराणा दुकानादारांकडे पूर्वी दररोज गूळ २० किलो, तर साखर ८० किलो विकत असे. मात्र, आता ४० ते ५० किलो गूळ व ५० किलो साखर विकली जाते. हा बदल मागील काही वर्षांत झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. मात्र, होलसेल व्यापाऱ्यांच्या मते शहरात दररोज २५ ते ३० टन साखर व १० ते १२ टन गुळाची विक्री होत आहे. गुळाची चहा टपरीवाल्यांकडून जास्त मागणी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
पूर्वीपासून साखरेपेक्षा गूळ जास्त भावात विकल्या जातो. आजही दोन्हीच्या किमतीत किलोमागे दहा रुपयांची तफावत दिसून येते.
चौकट
वर्ष साखर (प्रति किलो) गूळ
२००० १८ ते २० रु २० ते २२ रु.
२००५ ३१ ते ३२ रु ४० ते ४२ रु
२०१० ३७ ते ३८ रु ४६ ते ५० रु.
२०२० ३६ ते ३७ रु ४४ ते ४५ रु.
२०२१ ३४ ते ३५ रु ४४ ते ४५ रु.
-्-------------------------------------
(प्रतिक्रिया)
गुळाची वाढतेय मागणी
मागील दहा वर्षांत साखरेपेक्षा गुळाला मागणी वाढत आहे. साखरेची मागणी त्यातुलनेत स्थिर आहे. गुळाला घरगुतीसोबत चहा व्यावसायिकांकडून आता जास्त मागणी होत आहे.
श्रीकांत खटोड, किराणा व्यापारी
--
गुळाची विक्री ३० टक्क्यांनी वाढली
आम्ही पूर्वी दररोज २० किलो गुळ तर ८० किलो साखर विकत असत. पण मागील काही वर्षांत गुळाची मागणी ३० टक्क्यांनी वाढली व सध्या दररोज ५० किलो गूळ तर ४० ते ५० किलो साखर विकतो.
उमेश वखरे, किराणा व्यापारी
----
ग्रामीण भागात साखरेलाच डिमांड
बजाजनगर आसपासच्या परिसरात व ग्रामीण भागात गुळाला मागणी वाढली आहे, पण अजूनही साखरेलाच मागणी जास्त आहे. माझ्या किराणा दुकानातून दररोज ३० किलो गूळ, तर १०० किलो साखर विक्री होते. यावरून अंदाज लावू शकता.
मदन छापरवाल, किराणा व्यापारी (बजाजनगर)
-----
गूळ चहा बनले स्टेटस
साखरेचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर अनेकजण गुळाकडे वळाले. आता गुळाचा चहा स्टेटस बनले आहे. घरात आलेले पाहुणे साखर नको गुळाचा चहा करा, असे आवर्जून सांगतात.
लालचंद जव्हेरी ज्येष्ठ नागरिक (खाराकुँआ)
---
चौकट
अतिरेक नुकसानकारकच
साखर असो वा गूळ सेवनाचा अतिरेक झाल्यावर ते शरीरासाठी नुकसानदायकच ठरते. मात्र, गुळात मॅग्नेशिअम,कॉपर आणि लोह अधिक असते. गूळ प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्थेचे कार्य सुधारते. थकवा कमी होतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व साखरेला उत्तम पर्याय म्हणून गुळाकडे पाहिले जाते. जेवनानंतर गुळाचा खडा खाल्ल्याने त्याचा शरीराला फायदा होतो.
डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ