भारत दाढेल।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना वस्तूस्वरूपात लाभ न देता त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र मागील आठ महिन्यांपासून वस्तू खरेदीसाठी दर निश्चित होत नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत़शासनाने कल्याणकारी योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असला तरी संबंधित यंत्रणेची अंमलबजावणी होताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे़लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू स्वरूपात मिळणाºया लाभांचे हस्तांतर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे़ वस्तू विकत घेण्यासाठी विभागप्रमुखांना अनुदान ठरविण्याचे निर्देश आहेत़, परंतु वस्तूचे दर नेमके काय ठरवायचे? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे़ त्यामुळे विविध वस्तूंचे दर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जि़ प़ समाजकल्याण अधिकारी ए़ बी़ कुंभारगावे यांनी दिली़शासनाद्वारे विविध योजनेतंर्गत लाभार्थ्यांना वस्तूस्वरूपात लाभ मिळवून देण्यात येतो, परंतु आता ही पद्धत बंद करून संबंधित वस्तूची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे़ या निर्णयाचा परिणाम सर्व प्रशासकीय विभागांच्या कल्याणकारी योजनांच्या कार्यपद्धतीवर होणार असल्याने शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे़यासाठी कार्यपद्धती निश्चित केली असून यामध्ये संबंधित वस्तूबाबत वितरण योजना तयार करणे, वस्तू विकत घेण्यासाठी अनुदान ठरविणे, वस्तूंचे परिमाण ठरविणे, योजनेतंर्गत पात्रतेचे निकष ठरविणे, पात्र लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडणी करणे, लाभार्थ्याने खरेदी केलेल्या वस्तूची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करून पूर्णपणे खातरजमा झाल्यावर बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करणे, ही कामे करावी लागणार आहेत़दरम्यान, विविध विभागांद्वारे वस्तू खरेदी करण्यासाठी मागील काही दिवसांत काढलेल्या निविदा रद्द झाल्या आहेत़ जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना साधनसामग्रीचे मोठ्या प्रमाणावर वाटप होते़ समाजकल्याण विभागाच्या वतीने सायकल वाटप, शिलाई मशीन वाटप, मिरची कांडप यंत्र, पिठाची गिरणी, ताडपत्री आदी वस्तू वाटप केले जाते़ तर इतर विभागाच्या वतीने कृषीपंप, वीजपंप, पाईपलाईन, कृषी औजारे, मायक्रो ट्रॅक्टर, वैरण कापणी यंत्र, कडबा कट्टी यंत्र, पावर टिलर, विद्यार्थ्यांना लॅपटॉप आदी वस्तूंचे वाटप केले जाते़
वस्तूंचे दर निश्चित नसल्याने वैयक्तिक योजनेचा लाभ मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:37 AM