औरंगाबाद : जिल्हा परिषद प्रशासनाला अंधारात ठेवून परस्पर प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी जि.प.च्या ११ प्रशालांमध्ये अपंग समावेशित युनिट पुनर्स्थापित केले. चौकशी समितीच्या या निष्कर्षानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी लाठकर यांच्याकडील शिक्षणाधिकार्यांचा पदभार काल रात्री तडकाफडकी काढला. तथापि, आता शिक्षणाधिकारीपदाचा पदभार कोणाकडे जाणार, याबाबत आज दुसर्या दिवशी शैक्षणिक वर्तुळात कमालीची उत्सुकता व चर्चा होती.
प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर या कालपासूनच जिल्हा परिषदेत दिसून आल्या नाहीत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनीही यासंबंधी नाराजी व्यक्त केली. सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांकडून खर्चाचा आढावा घेण्यात आला; मात्र प्रभारी शिक्षणाधिकारी लाठकर या पूर्वकल्पना न देताच गैरहजर राहिल्या. पालकमंत्र्यांच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या खर्चाचा आढावा कोण देणार, याचाही त्यांनी विचार केला नाही, या शब्दात आर्दड यांनी त्यांच्यासंबंधीची नाराजी बोलून दाखवली.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड म्हणाले की, केवळ लाठकर यांच्याकडील पदभारच काढून घेतलेला नाही, तर त्यांनी ११ प्रशालांमध्ये पुनर्स्थापित केलेले अपंग समावेशित युनिट व त्याठिकाणी नेमलेल्या ११ विशेष शिक्षकांच्या सेवाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आाहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या या निर्णयामुळे त्या ११ विशेष शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. यांच्यापैकी काही विशेष शिक्षक मंगळवारी दिवसभर शिक्षण विभागात फिरत होते.
वाणी यांच्याकडे पदभारसोमवारी रात्री लाठकर यांच्याकडील पदभार काढून घेतल्यानंतर फुलंब्रीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांच्याकडे तो सोपविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी बोलून दाखविला; परंतु आज दुसर्या दिवशी वाणी यांनी शिक्षणाधिकार्यांचा पदभार घेतलेला नव्हता. मंगळवारी दिवसभर शिक्षण विभाग हा शिक्षणाधिकार्याविना वार्यावर दिसून आला.
कारणे दाखवा नोटिसाअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अपंग समावेशित युनिट पुनर्स्थापनप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांना अहवाल सादर केला. चौकशीमध्ये युनिटची पुनर्स्थापना व त्याठिकाणी ११ विशेष शिक्षकांची पुनर्स्थापना प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविल्याचा ठपका प्रभारी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व यासंबंधी फाईलमध्ये चुकीची टिपणी लिहिणारे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी संजीव कळम यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या दोघांनी मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाकडे नोटिसांचे उत्तर सादर केले आहे.