लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेत दोन वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षकांना वर्गनिहाय दर्जावाढ बहाल करण्यात आल्या होत्या. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली होती. अध्यापनात सुसूत्रता आणण्यासाठी यापुढे विषयनिहाय पदस्थापना देण्यात येणार आहेत. त्यामुळे दर्जावाढ मिळवून सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळविलेल्या शिक्षकांची गच्छंती होणार आहे.तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांनी २०१४ मध्ये समुपदेशन प्रक्रिया राबवून पदवीधर व बीएडधारक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरपद बहाल करुन दर्जावाढ दिली होती. दर्जावाढ दिलेल्या शिक्षकांना वाढीव वेतनश्रेणीही मिळाली. मात्र, समुपदेशन प्रक्रियेनंतर काही शिक्षकांनी सेवाज्येष्ठता नसतानाही दर्जावाढ पदरात पाडून घेतल्या होत्या. शिवाय विषय ग्राह्य धरुन पदस्थापना न दिल्याने कुठे एकाच विषयाचे दोन शिक्षक तर कुठे इंग्रजी, विज्ञान विषयांना शिक्षकच नाहीत, असा गोेंधळ निर्माण झाला होता. यासंदर्भात जि.प. सीईओंपासून ते शिक्षण आयुक्तांपर्यंत तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. २०१६ मध्ये शासनाने प्राथमिक पदवीधरपदाची दर्जावाढ मिळालेल्या शिक्षकांना विषयनिहाय पदस्थापना देण्याचे आदेश काढले होते.जिल्ह्यात १४७० शिक्षकांना दर्जावाढ देण्यात आल्या होत्या. या सर्वांची सेवाज्येष्ठता यादी तयार करुन इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विषयाप्रमाणे पदस्थापना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे दर्जावाढ प्राप्त शिक्षकांना आता पुनर्नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. विषयांचे निकष असल्याने जिथे आवश्यकता असेल तेथे शिक्षकांना पदस्थापना दिली जाईल. त्यामुळे सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळविलेल्या शिक्षकांनी धास्ती घेतली आहे.
प्राथमिक पदवीधर शिक्षकांना आता विषयनिहाय दर्जावाढ
By admin | Published: May 06, 2017 12:08 AM