Maharashtra Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजनरगमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रलंबित असलेल्या पाण्याच्या प्रश्नावरुन भाष्य केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील पाण्याच्या योजनेसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत करण्यात येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. महाविकास आघाडीवाल्यांना इथे घुसू देऊ नका, असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
महायुतीच्या १४ उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाष्य केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेचेही कौतुक केले आहे. जलयुक्त शिवार योजनेवर महाविकास आघाडीच्या सरकारने बंदी आणल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
"देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जलयुक्त शिवार योजना आणली होती. या योजनेमुळे मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न मिटायला सुरुवात झाली होती. पण मध्येच अडीच वर्षांसाठी महाविकास आघाडीचे सरकार आलं होतं यांनी या योजनेला बंद करून टाकलं होतं पण जेव्हा महायुतीचे सरकार आलं तेव्हा हे काम पुन्हा सुरू करण्यात आलं. छत्रपती संभाजी नगरमध्ये पाण्याच्या पुरवठ्यासाठी महायुती सरकारने १६०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची योजना आखली होती. पण त्याही योजनेवर महाविकास आघाडीच्या लोकांनी स्थगिती आणली. आता ही योजना जेव्हा पुन्हा सुरू केली गेली आहे तेव्हा त्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच्यासाठी केंद्र सरकार ७०० कोटी रुपये देत आहे हा फरक आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या लोकांमध्ये, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
"महाराष्ट्रात पाणी आणि दुष्काळाची समस्या सोडवणारं सरकार हवं की या योजनांना स्थगिती देणारे सरकार हवं. महाविकास आघाडीवाले पाण्याच्या थेंबासाठी तुम्हाला त्रास देतील. त्यामुळे महाविकास आघाडीवाल्यांना इथे घुसू देऊ नका. भाजपा महायुती आहे तर गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.