औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासाठी तयार झालेले विशेष ‘बोइंग ७७७-३०० ईआर’ विमान औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर उतरू शकणार आहे. त्या दृष्टीने विमानतळावर टॅक्सीवेसाठी टर्निंग पॅड आणि फिलेट्स विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी १८२ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. गतवर्षी भूसंपादनाच्या अनुषंगाने संयुक्त मोजणी आणि मार्किंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या विस्तारीकरणात विमानतळाची धावपट्टी वाढविणे, समांतर टॅक्सी रस्ता बांधणे तसेच अन्य सुविधा विमान कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विमानतळाच्या धावपट्टीचा विकास झाल्यानंतर एअरबससारखी मोठी विमाने औरंगाबाद विमानतळावर उतरू शकतील. तसेच विमान प्रवाशांचीही संख्या वाढेल.
विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा होत असताना सध्या टॅक्सीवेसाठी टर्निंग पॅड आणि फिलेट्स विस्तारीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. हे काम ‘बोइंग ७७७-३०० ईआर’ यासारख्या विमानाच्या दृष्टीने हाती घेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दौऱ्यात हेच विमान वापरण्यात येते. त्यामुळे या विमानाने पंतप्रधान औरंगाबादेत आगामी काळात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात विमानतळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सध्या हाती घेण्यात आलेल्या टर्निंग पॅड आणि फिलेट्स विस्तारीकरणासंदर्भात काही माहिती देता येणार नाही. विमानतळावर इतर मोठी विमाने, कमर्शियल विमाने उतरू शकतील का, हे आताच सांगता येणार नाही, असे सांगितले.
१२ हजार फूट लांबीच्या धावपट्टीसाठी हवे विस्तारीकरणभविष्यात चिकलठाणा विमानतळावर मोठी कार्गो विमाने तसेच जास्त विमान प्रवासी वाहतूक करणारे जम्बो विमानांच्या उड्डाण करण्यासाठी १२ हजार फूट लांबीच्या धावपट्टीची गरज राहणार आहे. या विमानतळावर विमानाची वाहतूक सुरळीत व्हावी. यासाठी समांतर टॅक्सी वे आवश्यक असते. धावपट्टीच्या विस्तारासह समांतर ‘टॅक्सी वे’साठी विस्तारीकरण आवश्यक आहे.
वाराणसी दौऱ्याप्रसंगी केले होते कामनरेंद्र मोदी यांच्या गतवर्षीच्या वाराणसी दौऱ्यापूर्वी बाबतपूर विमानतळाच्या टॅक्सी वे, टर्न पॅडचे काम हाती घेण्यात आले होते. आता असेच काम औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावर हाती घेण्यात आले आहे.