फुलंब्री : तालुक्यातील रेलगाव येथे बनावट गुटखा बनविणाºया कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून सुमारे चार लाखांचा गुटखा व गुटखा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी केली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार फरार झाला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावरुन त्यांनी अन्न सुरक्षा अधिकाºयांना सोबत घेऊन रेलगाव -पिंपळगाव रस्त्यावरील एक घरावर छापा मारला. तेथे संतोष कचरू खंडागळे हा सापडला तर घरात बनावट गुटखा तयार करण्याच्या विविध साहित्यासह तंबाखूमिश्रित केशरयुक्त पुड्या, केशर युक्त पान मसालाच्या अनेक गोण्या आढळून आल्या. याची बाजारात किंमत ४ लाख ४४५ रुपये आहे. हे सर्व साहित्य व गुटखा पोलिसांनी जप्त केले असून फुलंब्री पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी योगेश सुरेश कणसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी संतोष कचरू खंडागळे याला अटक केली असून त्याचा एक साथीदार फरार झाला आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव, सहायक फौजदार सुधाकर दौड, जमादार रंगाराव बाविस्कर, विठ्ठल राख, विनोद तांगडे, संतोष चव्हाण, शेख इलियास, सहायक फौजदार लटपटे यांनी भाग घेतला.
रेलगाव येथील बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:54 PM