वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगर परिसरात सुरु असलेल्या एका गॅस रिफिलिंग अड्डयावर गुरुवारी रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा मारुन एक रिक्षासह गॅस भरण्याचे साहित्य व व्यवसायिक वापराचे सिलिंडर जप्त केले. या प्रकरणी दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे डीबी पथक गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगर परिसरात गस्त घालत होते. या परिसरात ेरिक्षामध्ये अवैध रित्या गॅस भरुन दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने नायब तहसीलदार दत्तात्र्य निलावाड यांना घटनास्थळी बोलवून घेतले.
यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने पंच व नायब तहसीलदार निलावाड यांना सोबत घेऊन सिडको महानगरातील एका पेट्रोलपंपालगत छापा मारला. यावेळी रिक्षा (एम.एच.२०-ईएफ ०९५९) मध्ये व्यवसायिक वापराचे सिलिंडर विद्युत मोटारीच्या सहाय्याने भरले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी रिक्षाचालक इसाखॉ साबेर खॉन (२८ रा. अंगुरी बाग,मोंढा रोड, मोतीकारंजा) यास पकडले.
त्याची चौकशी केली असता शेख नबाब हा अड्डा चालवित असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पथकाने रिक्षा, ७ हजार ५०० रुपये किमंत असलेले एचपी कंपनीचे ५ व्यवसायिक वापराचे रिकामे सिलिंडर, आदी जवळपास ७८ हजार रुपये किमंतीचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोहेकॉ.वसंत शेळके यांच्या फिर्यादीवरुन शेख नवाब व इसा खॉन याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे