औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सार्वत्रिक बदल्यांसाठी पदोन्नती आणि समायोजनाची क्रमवारी बदलली आहे. त्यानुसार पहिल्यांदा पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व नंतर बदल्यांची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिली. सध्या जिल्हा परिषदेत उर्दू आणि मराठी माध्यम शिक्षकांच्या पदनिर्धारणाचा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात विविध संघटनांनी सोमवारी शिक्षण सभापती विनोद तांबे, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तमराव चव्हाण आदींची भेट घेऊन हा पेच सोडविण्याची विनंती केली. त्यानुसार सुधारित संचमान्यतेमध्ये जि.प. शाळेत शिकत असलेले उर्दू माध्यमाचे विद्यार्थी आणि त्याच शाळेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांचे पदनिर्धारण केले जाईल. त्यानंतर १६, १७ आणि १८ मे रोजी केंद्रप्रमुखांच्या ८० जागांसाठी, मुख्याध्यापकांच्या ७५ जागांसाठी आणि पदवीधर शिक्षकांच्या २५० जागांसाठी पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पदोन्नतीची प्रक्रिया आटोपल्यानंतर १९ मेपासून समायोजन व त्यानंतर बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१५ च्या संचमान्यतेनुसार जि.प. शाळांतील शिक्षकांचे एकत्रित पदनिर्धारण करण्यात आले होते. त्यावेळी उर्दू व मराठी माध्यमांच्या शिक्षकांसाठी शाळेचे एकच ‘यू डायस कोड’वर वापरण्यात आले होते. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली होती. त्यास उर्दू व मराठी शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे शिक्षण संचालक कार्यालयाने सुधारित संच मान्यतेस परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार आता सुधारित संचमान्यतेमध्ये एकाच ‘यू डायस कोड’वर पण मराठी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थी संख्येनुसार पदनिर्धारण केली जाईल. ती ५ मेपर्यंत पूर्ण करण्याचा मानस शिक्षण विभागाने केला आहे.
अगोदर पदोन्नतीच, नंतर बदल्या
By admin | Published: May 03, 2016 12:40 AM