जालना : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पहिले प्राधान्य राहणार असल्याचे मत नूतन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले. मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी पोकळे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.पोकळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी कायदा व सुव्यवस्थेसह विविध मुद्यांवर वार्तालाप केला. पोकळे म्हणाले, जिल्ह्यात मी काही नवीन नाही. याआधी सुध्दा भोकरदन तालुक्यात डीवायएसपी पदी चार वर्षे काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काम करीत असताना जुना अनुभव निश्चितच कामी येणार आहे. येथील भागाशी जोडलेलो असल्याने काम करण्यास सोपे जाईल. त्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे मत सुध्दा पोकळे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्यांना पोलिसाकडून मोठ्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आमचा पहिला प्रयत्न राहील. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अंकुश ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याचे माझे पहिले प्राधान्य राहणार आहे. भोकरदन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अनेक गुन्हेगारी टोळीशी सामना झाला आहे. आत्ता जिल्ह्याचा पोलीस प्रमुख या नात्याने आत्ता जिम्मेदारी वाढली आहे. माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी माझे प्रयत्न राहणार असल्याचे पोकळे यावेळी म्हणाले. त्यासाठी माझा पोलीस दलातील २३ वर्षाचा अनूभव कामी येईल.महिलांच्या सुरक्षतेसाठी कार्यरत दामिनी पथक असो वा अॅपच्या माध्यमातून करण्यात येत असलेले कामे चांगली आहेत. यात काही नव्याने उपाययोजना करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास आपला प्रयत्न राहणार आहे. यावेळी उपअधीक्षक अभय देशपांडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, अनंत कुलकर्णी, साईनाथ ठोंबरे, विनोद इज्जपवार, बाळासाहेब पवार, भगीरथ देशमुख योगेश गावडे उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य
By admin | Published: May 03, 2017 12:17 AM