औरंगाबाद : वॉन्टेड गुन्हेगार टिप्या उर्फ शेख जावेद याच्या संपर्कात असलेल्यांवर शहर पोलीस लक्ष ठेवून होते. तेव्हा एक तरुणी आणि दोन जण टिप्याच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्डवरुन उघडकीस आले. कारागृह सुरक्षारक्षक या गँगच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्डवरून समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने रक्षकाला विश्वासात घेत चौकशी केली. तेव्हा धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुरक्षारक्षक ‘हनी ट्रॅप’चा शिकार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जटवाडा येथील संगणक अभियंता असलेली तरुणी दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे फिरण्यासाठी तिला मागे-पुढे गुंडाची गरज होती. तिने जटवाडा येथील मित्राला सांगून गुंडाचे संपर्क मागितले. तेव्हा त्या मित्राने सुरक्षारक्षकाचा नंबर देत त्याच्याकडून गुंडांचे संपर्क घेण्यास सांगितले. सुरक्षारक्षकाने तरुणीवर भाळून हर्सुल कारागृहात असलेल्या टिप्यासह अर्जुन राजू पवार, दीपक दसपुते यांची तिची ओळख करुन दिली. अनेकांना ब्लॅकमेल करण्यात हातखंडा असलेल्या टिप्याने नव्याने ओळख झालेल्या मैत्रिणीला सुरक्षारक्षकासोबत प्रेमाच्या गप्पा मारण्यास भाग पाडले. तसेच या गप्पांचे रेकॉर्डिंग केले. हे रेकॉर्डिंग सुरक्षारक्षकास अनेकवेळा ऐकवले. टिप्या गँग जेव्हा पैशांची गरज पडेल तेव्हा सुरक्षारक्षकाकडून दहा-पाच हजार रुपये घेत असे. पैसे देण्यास नकार देताच मैत्रिणीच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे सुरक्षारक्षक सतत त्यांचे चोचले पुरवित असे. १७ सप्टेंबर रोजी पोलीस अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर टिप्याला शहरातून पळून जाण्यासाठी पैशांची गरज होती. त्याने मैत्रिणीच्या माध्यमातून सुरक्षारक्षकाकडून १ लाख १५ हजार रुपये उकळले आणि तो १ लाख रुपये घेऊन पसार झाल्याचेही सुत्रांनी सांगितले.
चौकट.....
तरुणी उच्चभ्रू कुटुंबातील
गुंडांच्या संपर्कात स्वत:हून आलेली संगणक अभियंता तरुणी उच्चभ्रू कुटुंबातील आहे. तिच्या वडिलांचे चार मजली घर असून, मेडिकलसह इतर व्यवसाय आहेत. ती काय करते, याचा वडिलांना थांगपत्ता नसल्याचेही पोलीस चौकशीत समोर आले आहे.