पैठण : पैठण येथील जिल्हा खुल्या कारागृहातून सोमवारी कैदी फरार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एका कैद्याने कारागृह रक्षकाची नजर चुकवून पोबारा केला आहे. गेल्या वर्षभरात कारागृहातून कैदी फरार होण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली असून वर्षभरात या कारागृहातून सात कैदी फरार झाल्याच्या घटनांची पैठण तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे. वारंवार कारागृहातून कैदी फरार होत असल्याने कारागृहाच्या सुरक्षे यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोमवारी कैदी साहिल रब्बन खान याने कारागृहाच्या कातपूर येथील शेतीतून पलायन केले या बाबत कारागृह प्रशासनाने औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटत नाही तोच मंगळवारी मध्यरात्री राजू गंगाप्रसाद वर्मा (४४) या कैद्याने फरार होत कारागृह प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली.
राजू गंगाप्रसाद वर्मा यास ९ ऑक्टोबर२०१८ रोजी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून पैठण येथील खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आले होते.नवगाव पोस्ट सरवण तासेलपूर्वा जि उन्नाव येथील मुळ रहिवाशी असलेल्या राजू वर्मा यास मुंबई सत्र न्यायालयाने मे, २०१० ला हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती असे पैठण खुल्या कारागृहाचे अधिक्षक असद जुबेर मोमीन यांनी सांगितले.
कारागृहात ३६ शिपायांच्या जागा रिक्तकारागृहात कैद्यावर नजर ठेवण्यासाठी एकूण ८० शिपाई पदे मंजूर आहेत, प्रत्यक्षात कारागृहात ४९ शिपाई कार्यरत असून ३६ शिपायांच्या जागा रिक्त आहेत.
कारागृहास संरक्षक भिंत नसून हे खुले कारागृह आहेसध्या कारागृहात ४७५ कैदी शिक्षा भोगत आहेत. कारागृहाचे आठ शेतीशेड असून या शेडवर कायम स्वरूपी शिपाई बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याने कारागृह प्रशासनाकडे ३३ शिपायांचे मनुष्यबळ दैनंदिन वापरात आहे. कैद्यांची संख्या मोठी असल्याने व खुला वावर असल्याने कैदी पळून जाण्याच्या घटनेत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान शिपायांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात या साठी वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आली आहे असे कारागृह अधिक्षक असद जुबेर मोमीन यांनी सांगितले.