औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार घेताना तुरुंग रक्षकाची नजर चुकवून हातकडी काढून ५ डिसेंबर रोजी सकाळी पसार झालेला कैदी किशोर विलास आव्हाड याला गुन्हे शाखा पोलिसांनी अखेर शनिवारी बेड्या ठोकल्या.
माय-लेकीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपी किशोरला जानेवारी महिन्यात ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तेव्हापासून तो तुरुंगात होता. ॲपेंडिक्सचा त्रास सुरू झाल्यामुळे ३ डिसेंबरच्या रात्री त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला हातकडी लावून ठेवले होते. उपचारादरम्यान त्याच्या सिटी स्कॅनचा अहवाल आणण्यासाठी तुरुंग रक्षक अन्य वॉर्डांत गेले असता कैदी किशोरने ५ डिसेंबरला घाटीतून पहाटे धूम ठोकली होती. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता.
दरम्यान, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार प्रकाश चव्हाण, संदीप सानप, प्रभाकर राऊत हे गस्तीवर असताना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तो यशवंतनगर परिसरातील रेल्वे रुळावर उभा असल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. यानंतर पथकाने साध्या वेशात तेथे जाऊन शिताफीने किशोरला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.