पैठण ( औरंगाबाद) : येथील खुल्या कारागृहात आता कैदी हायजेनिक गुळाची निर्मिती करणार आहेत. शुक्रवारी ५ लाख ३० हजार रुपये खर्चून कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या हायजेनिक गु-हाळाचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्या हस्ते करण्यात आले. येथे नैसर्गिक पद्धतीने गुळाची निर्मिती करण्यात येणार असून, निर्माण झालेला गूळ राज्यभरातील कारागृहात पाठविला जाणार आहे.
गु-हाळाच्या शुभारंभप्रसंगी खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सचिन साळवे, पैठण न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश ए. जे. कराड, नाशिक कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, एस. एन. ठेणगे, मानवतकर, बाळासाहेब जाधव, बिभिषण तुतारे, तुरुंगाधिकारी एन. एम. भानवसे, कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. नागदरवाड, किशोर बोंडे, पोलीस निरीक्षक चंदन ईमले, सुदाम वारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहाकडे जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जवळपास ३०० एकर जमीन आहे. या जमिनीत कैद्यांचे मनुष्यबळ वापरून शेती केली जाते. विविध भाजीपाला व उसाची लागवड या जमिनीत केली जाते. येथे गु-हाळ सुरू करण्यासाठी कारागृह अधीक्षक साळवे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर मान्यता मिळाल्यानंतर येथे ५ लाख ३० हजार रुपये खर्च करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. कोल्हापूर पद्धतीची गु-हाळ यंत्रणा कारागृहात उभी करण्यात आली आहे.
सर्व कारागृहांना जाणार गुळ येथे उत्पादित शेकडो टन गूळ महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहांना पुरविला जाणार आहे. या गु-हाळ यंत्रणेची रोजची क्षमता २५ टन असली तरी सुरुवातीला ६ ते ७ टन उसाचे गाळप करून हळूहळू गाळपक्षमता वाढविण्यात येणार आहे.
६५ एकर क्षेत्रात ऊस लागवड कारागृह प्रशासनाच्या ताब्यातील शेतात सध्या ३५ एकर ऊस उभा असून, जवळपास ६५ एकर क्षेत्रात ऊस लागवड सुरू आहे. गु-हाळाबाबतची तांत्रिक माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन वेळेस कोल्हापूर येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आहे.