औरंगाबाद : जालना रोडवर खाजगी प्रवासी बसला सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असे असतानाही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सायंकाळी सात वाजताच भरधाव खाजगी बसच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खाजगी बसवर कारवाई करीत त्यांना ठरवून दिलेल्या महावीर चौक, अदालत रोड, शहानूरमियाँ दर्गा परिसरात थांबे दिले होते. रात्री ११ नंतरच शहरातील जालना रोडवर परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील कोंडी सुटलेली होती; परंतु पुन्हा रस्त्यावर खाजगी बससेवा बिनधास्तपणे चालविली जात असून, वाहतुकीला अडसर केला जात आहे. काही बस तर दिवसादेखील जालना रोडवरून जाताना दिसतात. त्या सर्व खाजगी बस या बायपासमार्गे जाव्यात, असे आदेशित केले होते; परंतु जालना रोडवर अदालत रोड, सिडको परिसरातून ठराविक वेळेपूर्वी वाहने चालविली जातात, त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
नगरनाका ते केम्ब्रिज चौकापर्यंत वाहतूक शाखेचे कर्मचारी असतानादेखील खाजगी बस शहरात येताना दिसत आहेत. सिडको पुलाजवळ तर सिडको बसस्थानकाकडून जळगाव रोडकडे जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने प्रवाशांची वर्दळ वाढली आहे; परंतु जालना रोड पुन्हा वाहतूक कोंडीला तोंड देत आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची भीती वाढली आहे. पोलीस याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.