औरंगाबाद : ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येपुढे उपचारासाठी लागणारे इंजेक्शन अपुरे पडत आहेत. ही स्थिती संपूर्ण राज्यभरात आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालय आणि अन्य जिल्ह्यांतून ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना घाटीत रेफर केले जात आहे.
औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’ची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५९६वर गेली असून, यातील तब्बल ३४३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. एकाच वेळी तीनशेवर रुग्ण भरती असल्याने उपचाराचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे. ‘म्युकरमायकोसिस’च्या एका रुग्णाला रोज तीन यानुसार १४ दिवसांत ४२ इंजेक्शन द्यावे लागतात. रुग्णांसाठी आवश्यक इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण रुग्णांच्या नातेवाइकांची आणि खासगी रुग्णालयांकडून इंजेक्शनची शोधाशोध सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून इंजेक्शन मिळतात. परंतु त्याची संख्या अगदी कमी आहे. दुसरीकडे घाटीतील रुग्णांसाठी पुरेसे इंजेक्शन्स प्राप्त होत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण आता घाटीत दाखल होण्यावर भर देत आहेत. अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांतील रुग्णही घाटीत भरती होत आहेत.
शस्त्रक्रियेनंतर घाटीत
लवकर निदान झाले तर बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. दररोज इंजेक्शन्स उपलब्ध होत आहेत. घाटीतील रुग्णांसाठी पुरेसे इंजेक्शन मिळत आहे. खासगी रुग्णालयातील रुग्ण शस्त्रक्रियेनंतर इंजेक्शनसाठी घाटीत दाखल होत आहेत, असे कान, नाक, घसा विभागांचे डाॅ. वसंत पवार म्हणाले.