औरंगाबाद : महापालिकेने संत एकनाथ रंगमंदिराच्या नुतणीकरणावर तब्बल ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. नाट्यगृह सुस्थितीत रहावे म्हणून प्रशासनाने खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध झाला. विरोध मावळताच परदेशी ॲडस् या संस्थेला नाट्यगृह देण्यात आले. यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला असून, ही संस्था दरवर्षी मनपाला १९ लाख रुपये देणार असल्याचे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.
२५ जानेवारीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सुसज्ज नाट्यगृहाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व काही रंगकर्मींनी खासगीकरणाला कडाडून विरोध दर्शविला. पण त्याची दखल न घेता महापालिकेने खासगीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवली होती. ८ एजन्सींनी मनपाकडे खासगीकरणासाठी प्रस्ताव दाखल केले होते. यासंदर्भात थेटे यांनी सांगितले की, परदेशी ॲडस् संस्थेचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. ही संस्था महापालिकेला दरवर्षी १९ लाख रुपये भाडे देणार आहे.