भारत दाढेल। लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गरिबीसोबतच दिव्यांगत्वावर मात करीत घरकुलात राहणाऱ्या प्रिया राहुल भगत हिने पाचवीच्या जवाहर नवोदय परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे़ प्रियाचा शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित झाल्याने तिच्या पुढील शिक्षणाची चिंता कमी झाली आहे़ तरोडा खु़ भागातील राष्ट्रमाता विद्यामंदिरात इयत्ता पाचवीत शिकणारी प्रिया जन्मताच एका हाताने अपंग आहे़ वडील राहुल भगत दररोज मोलमजुरी करून आपले घर सांभाळात मुलांच्या शिक्षणासाठी धडपडतात़ मात्र तुटपुंजी मजुरी मिळत असल्याने पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न त्यांच्या समोर होता़ त्यात दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न पडलेला़ शिक्षकांनी प्रियाला नवोदय परीक्षेला बसविल्यानंतर पुस्तके विकत घेण्याचे कोडे होतेच़ आईला घरकामात मदत करीत नवोदयचा नियमित अभ्यास करण्याचा निश्चिय प्रियाने केला़ त्यानंतर दररोज दोन, तीन तास ती अभ्यास करायची़ कोणत्याही शिकविणी शिवाय केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीने नवोदयची परीक्षा दिली़ ३० जून रोजी निकाल हाती येताच प्रिया दिव्यांगातून जिल्ह्यात प्रथम आल्याचे कळाले़ शाळेतील शिक्षकांना आनंद झाला़ तिचा सत्कार करण्यासाठी सर्व शिक्षक प्रियाच्या घरी गेले़ यावेळी त्यांनी शंकरनगर येथील नवोदय विद्यालयात प्रियाला प्रवेश मिळणार असल्याचे पालकांना सांगितले़ तेव्हा आई- वडीलांना अश्रू आवरता आले नाही़ अत्यंत गरीब परिस्थितीतून प्रियाने हे यश मिळविल्याबद्दल दामोदरनगर व तथागतनगर येथील नागरिकांनी प्रियाचा गौरव केला़ यावेळी कविता नगरकर, शाळेचे मुख्याध्यापक डी़ एम़ जाधव, सहशिक्षक सी़ डी़ क्षीरसागर, कावळे, मोहिते, बी़ टी़ सावंत, भीमराव भगत, चावरे, खाकरे, सोनकांबळे आदींची उपस्थिती होती़
गरिबीसोबतच दिव्यांगत्वावर मात करणारी प्रिया भगत जिल्ह्यात प्रथम
By admin | Published: July 14, 2017 12:17 AM