बोरगाव बाजार : पाणंद रस्ता या योजनेअंतर्गत, बोरगाव बाजार ते सावखेडा या पाणंद रस्त्यांच्या कामास तहसील कार्यालयाच्या वतीने २७ मे २०१९ रोजी कार्यरंभ आदेश देण्यात आले. दोन वर्षानंतरदेखील स्थानिक ग्रामपंचायतीकडून पाणंद रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुुळे शेतकऱ्यांना अद्यापही हाल अपेक्षा सहन करावा लागत आहेत.
बोरगाव बाजार परिसरातील सर्व पाणंद रस्त्याची कामे मार्गी लागतील, अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांना होती. कार्यरंभ आदेश दिल्यानंतरदेखील ग्रामपंचायत कामाला लागेल असे वाटत असताना ग्रामपंचायतीकडून तांत्रिक कारणे समोर करून तहसील कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.
----
रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण
बोरगाव बाजार ते सावखेडा या रस्त्याच्या सुरुवातीस ठिकठिकाणी काही गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. या रस्त्यावर बागवान, राजपूत, कोष्टीसह, आदी समाजाच्या स्मशानभूमी आहेत. तसेच सावखेडा मार्गे आमठाणा, पाचोरा जाण्यासाठी सोईचा व जवळचा मार्ग आहे. वीस वर्षांपासून या रस्त्याबाबतचा दरवर्षी ठराव घेणे व नतंर विसरून जाणे असा वेळकाढूपणा ग्रामपंचायत करीत आहे. नागरिकांच्या जिवाशी किती दिवस खेळ मांडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.