लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहावीच्या परीक्षेचे अर्ज यावर्षीपासून आॅनलाईन भरण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा अभाव, आधार क्रमांक नसल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात असल्याने विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये शाळेत जावे लागत आहे.डिजिटल इंडियाच्या नावाखाली प्रत्येक काम आॅनलाइन करण्याचा आग्रह शासनाचा आग्रह असून, त्याची सक्तीने अंमलबजावणीही केली जात आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधाच उपलब्ध नसल्याने आॅनलाईन कामे करताना संबंधित यंत्रणेची गैरसोय होत आहे. दहावीच्या परीक्षेचे आॅनलाईन फॉर्म भरताना शिक्षक व विद्यार्थ्यांची अशीच तारांबळ उडत आहे. १६ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर दहावीचे परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. आॅनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची जबाबदारी शाळांची आहे. फॉर्म भरताना प्रथमच आधार क्रमांक भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही त्यांना शपथपत्र सादर करावे लागत आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना धावपळ करावी लागत आहे. तसेच परीक्षा अर्जात विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाणाची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये अर्ज भरण्याची ही प्रक्रिया राबवली जात आहे. ग्रामीण भागात असणा-या इंटरनेट सुविधा मिळत नाही. बहुतांश शाळांमध्ये इंटरनेट सुविधाही नाही. त्यामुळे शिक्षकांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंटरनेट केंद्रावर जावे लागत आहे. शिवाय इंटरनेट वापरासाठी अनेकदा मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत.
दहावीचे परीक्षा फॉर्म भरताना दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 1:17 AM