लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिंक रोड ते पैठणपर्यंतच्या चौपदरीकरणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान व भविष्यात होणाºया समांतर जलवाहिनीची अडचण येणार आहे. २५ कि़मी. परिसरात जलवाहिनी चौपदरीकरणासाठी अडसर ठरणार असून, त्याबाबत तातडीने तोडगा निघाला, तर त्या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम मार्गी लागेल आणि रस्त्याच्या कामासाठी पुढील प्रक्रिया करणे सोपे होईल, असे नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत सांगितले. याप्रकरणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मनपाला रस्त्याचे चौपदरीकरण गृहीत धरून जलवाहिनी टाकण्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.औरंगाबाद ते पैठण या रस्त्यासाठी चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी भारतमाला योजनेत घेतला आहे. त्यानुसार रस्त्याच्या डीपीआरचे काम दीड वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले; परंतु २५ कि़मी.च्या अंतरातील डीपीआरचे काम ठप्प आहे. त्या रस्त्यामध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी २० ते २५ कि़मी.च्या अंतरात आहे. त्याच भागातून समांतर जलवाहिनीचे नियोजन आहे. ती जलवाहिनी टाकण्यासाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाची एनओसी घेण्यात यावी. रस्त्याच्या डीपीआरचे काम होत आले आहे. जुन्या जलवाहिन्या समांतरचे काम करताना काढून टाकण्यात येतील का? असा प्रश्न एनएचएआयने मनपाला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केला. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी बैठकीत सांगितले, जुन्या जलवाहिनी काढण्यात येणार नाहीत. नक्षत्रवाडी ते शहर ही जलवाहिनी बंद होईल. ती ७०० मि.मी.ची जलवाहिनी आहे, तर १४०० मि.मी.ची जलवाहिनी सुरू राहील.
चौपदरीकरणात तिढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:19 AM