लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा नियोजन समितीच्या साडे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीचे प्रोसिडींग अद्यापही तयार झाले नसून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या संदर्भात वेळ मिळत नसल्याने त्यांच्याच स्तरावर ही फाईल प्रलंबित आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे.जिल्हा नियोजन समितीची १५ मे रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. बैठकीत झालेल्या निर्णयाविषयीचा कार्यवृत्तांत अहवाल (प्रोसिडींग) तातडीने तयार करणे आवश्यक असते. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते; परंतु, या बैठकीचे प्रोसिडींग तब्बल साडेतीन महिन्यानंतरही तयार झालेले नाही. या संदर्भातील फाईल पालकमंत्री गुुलाबराव पाटील यांच्या मुंबई येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले़ पालकमंत्री पाटील यांना यावर निर्णय घेण्यास वेळ मिळत नाही. परिणामी प्रोसिडींगची फाईल प्रलंबित आहे. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील यांची पालकमंत्री पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांना परभणीसाठी फारसा वेळच मिळत नाही. १ मे व १५ आॅगस्टच्या ध्वजारोहणाला ते आले. परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळीही त्यांचा धावता दौरा होता. त्यानंतर सिमूरगव्हाण येथील धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा दौरा झाला. या दौºयात त्यांनी एकही प्रशासकीय बैठक घेतली नाही. मुळात जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांमधील अंतर्गत वादामुळेच त्यांना परभणीच्या पालकमंत्रीपदात रस नसल्याचे समजते. त्यातूनच परभणीशी संबंधित निर्णय लवकर घेतले जात नसल्याची चर्चा आहे. त्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी परभणीच्या अधिकाºयांची मुंबईत बैठक घेतली होती. या बैठकीत काही सूचना देण्यात आल्या. परंतु, त्याची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करणारी स्थानिक पातळीवरील यंत्रणा त्यांनी स्थापन केलेली नाही. परिणामी विकासकामे ठप्प होत आहेत. दिवाकर रावते पालकमंत्रीपदी होते त्यावेळी ते सातत्याने विकास कामांचा आढावा घेत होते़ शिवाय त्यांचा नियमित जिल्हा दौरा असायचा़ त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय रहायची; परंतु, आता गुलाबराव पाटील यांना परभणीला येण्यासाठी वेळ मिळत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ही सुस्त झाली आहे़ परिणामी विकास कामे मार्गी लागेनाशी झाली आहेत़
‘नियोजन’च्या ‘प्रोसिडींग’ला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:46 PM