लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी चीनमधील एका खाजगी कंपनीने होकार दर्शविला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत ३० मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करणारी नऊ यंत्रे बसविण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नारेगाव येथील कच-याचे डोंगरही नष्ट करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. कंपनीने मंगळवारी सादर केलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये खर्चाचे आकडे पाहून अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले आहेत. मनपाने कंपनीला अद्याप होकार दर्शविलेला नाही. लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दिले.नारेगाव परिसरातील शेतक-यांनी डेपोत कचरा टाकण्यासाठी मनपाला फक्त ९० दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत मनपाला पर्यायी यंत्रणा उभारणे गरजेचे झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या एका कंपनीने कच-यापासून बायोगॅस तयार करण्याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर आता चायना येथील एक कंपनीला पाचारण करण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिका-यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पॉवर पॉइंट पे्रझेंटेशन सादर केले. छोटा आणि मोठा प्रकल्प कसा उभारता येऊ शकतो. त्याला जागा किती लागणार, कच-यापासून अॅश कशी तयार होते. त्यापासून विटा कशा तयार होतात यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले.महापालिकेची गरज लक्षात घेऊन कंपनीने शहरात ९ ते १० ठिकाणी छोटे प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली. ३० मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या केंद्रात राहील. त्यासाठी अर्धा ते पाऊण एकर जागा लागेल. पाच कोटी रुपये यंत्रणा उभारण्यासाठी लागतील. बांधकामाचा खर्च वेगळा राहणार आहे. या केंद्रामुळे आसपासच्या नागरिकांना किंचितही त्रास सहन करावा लागणार नाही, असा दावा कंपनीच्या अधिका-यांनी केला. यावेळी महापौर बापू घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता गजानन मनगटे, ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात, गोकुळ मलके, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा प्रकल्पप्रमुख डी.पी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांची उपस्थिती होती.
कच-यावर प्रक्रिया; चीनच्या कंपनीचा होकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:58 AM