औरंगाबाद : रोजच्या रोज कचरा निर्माण होण्याचे अनेक स्रोत आहेत. यापैकी सर्वांत मोठा स्रोत म्हणजे स्वयंपाकघरातून निघणारा कचरा. रोज घरातून निघणाऱ्या कचऱ्यापैकी ४० टक्के कचरा स्वयंपाकघरातून निघतो. या ४० टक्के कचऱ्याचे जरी रोज योग्य व्यवस्थापन झाले, तरी बहुतांश प्रमाणात कचऱ्याची समस्या सुटू शकते. त्यामुळेच ‘बायोगॅस निर्मिती’ हा घनकचरा व्यवस्थापनाचा सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येऊ पाहतो आहे. बायोगॅसमुळे कचऱ्याची विल्हेवाट तर लागतेच, शिवाय अन्न शिजविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. बायोगॅस निर्मितीचे मॉडेल :बायोगॅस निर्मितीसाठी पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिकचा मोठ्या आकाराचा ड्रम वापरण्यात येतो. घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा बाल्कनीमधील जागेत हा ड्रम ठेवता येऊ शकतो. या ड्रमच्या झाकणाला वरच्या दिशेला एक छिद्र पाडण्यात येते. या छिद्रामध्ये नरसाळे अडकवण्यात येते. रोजचा कचरा ड्रमचे झाकण उघडून थेट न टाकता या नरसाळ्यातून टाकावा लागतो. कचरा टाकल्यावर हे छिद्र बंद करावे. याच झाकणाला अजून एक छिद्र पाडण्यात येते, त्या छिद्रात एक पाईप अडकवला जातो. या पाईपचे दुसरे तोंड एका मोठ्या आकाराच्या रबरी पिशवीत उघडते. ड्रममध्ये तयार होणारा बायोगॅस या पाईपच्या माध्यमातून रबरी पिशवीत वाहून आणला जातो. या रबरी पिशवीला आणखी एक दुसरा पाईप लावतात. त्या पाईपचे दुसरे टोक बायोगॅस शेगडीला लावण्यात येते. या प्लास्टिकच्या ड्रमला एक छोटेसे आऊटलेट असते. यामधून कचऱ्यातून तयार होणारे पाणी बाहेर पडते. बायोगॅस निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कचरा :उरलेले अन्न, शिळे किंवा कुजलेले अन्न, फळांची साले, टरफले, पालेभाज्यांच्या काड्या, झाडांची सुकलेली पाने, गवत, चहा करून उरलेली चहा पावडर. 1बायोगॅस निर्मितीचे हे मॉडेल आपल्या घरात बसवल्यानंतर सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस या ड्रममध्ये नित्यनेमाने स्वयंपाकघरात निर्माण होणारा कचरा टाकावा. ज्या ठिकाणी बायोगॅसचे अशा प्रकारचे मॉडेल आधीपासून कार्यरत आहे, त्या ड्रममधील कचऱ्यातून निर्माण होणारे थोडे पाणी या नव्या ड्रममध्ये टाकावे. 2ज्याप्रमाणे दुधापासून दही बनवताना दुधात विरजण म्हणून थोडे दही टाकतात, त्यासारखाच हा प्रकार आहे. पंधरा-वीस दिवसांच्या काळात ड्रममध्ये टाकलेला कचरा कुजतो आणि त्यापासून वायूची निर्मिती होते. 3हाच वायू रबरी पिशवीत जमा होत जातो. ही पिशवी बायोगॅस भरून पूर्णपणे फुगली की मग बायोगॅस शेगडी वापरायला सुरुवात करावी. साधारणत: रोज अर्धा किलो ओला कचरा टाकल्यावर पंधरा मिनिटांसाठी गॅस चालेल, एवढा बायोगॅस निर्माण होतो. एका घरातून रोज एवढा कचरा निघणे शक्य आहे. रोज अंदाजे ६ ते ८ किलो ओल्या कचऱ्यापासून दोन ते अडीच तास गॅस चालेल, एवढ्या बायोगॅसची निर्मिती होते. एका कुटुंबातून एवढा ओला कचरा रोज निर्माण होत नसल्याने भाजीविक्रेते, हॉटेलचालक, मेसचालक किंवा शेजारी आदींची आपण मदत घेऊ शकतो. त्यामुळे पर्यायाने त्यांच्याकडून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तर होईलच, शिवाय बायोगॅसची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होईल.
बायोगॅस निर्मिती... एलपीजीपासून मुक्ती...
By admin | Published: May 10, 2016 12:44 AM