औरंगाबाद : ‘शहरातील नाट्यमंदिरात महिन्यातून तीन ते चार वेळा होणारी व्यावसायिक नाटके’ हे कधी काळचे वास्तव आज औरंगाबादकर रसिकांसाठी दिवास्वप्न झाले आहे. शहराच्या रंगभूमीला लागलेली ही घरघर सांस्कृतिक चळवळीला संपुष्टात आणणारी असून, आता औरंगाबादकरांना वर्षातून अवघी दोन- तीन नाटके बघायला मिळत आहेत.
संत एकनाथ रंग मंदिराच्या बांधकामाबाबत अजूनही सगळे गोलमाल आहे. एकीकडे विविध कामांची निविदा काढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र सगळे काम ठप्पच असल्याचे दिसून येते. एका रंगमंदिराची ही अवस्था आणि दुसरीकडे संत तुकाराम नाट्यगृहाची दुरावस्था यामुळे शहरातील नाट्यप्रेमींची मात्र गळचेपी होत आहे. अशा परिस्थितीमुळे वर्षभरात अवघ्या एक- दोन व्यावसायिक नाटकांचे प्रयोग शहरात होऊ शकले.
अशा परिस्थितीमुळे काही कामानिमित्त पुणे- मुंबईला गेल्यास तिकडेच नाटक पाहतो, असेही काही नाट्यप्रेमींनी सांगितले.प्रशासनाच्या दोन्ही नाट्यगृहांच्या अशा अवस्थेमुळे नाट्य व्यावसायिकांना व्यावसायिक दर्जेदार नाटकांचे प्रयोग लावण्यासाठी खाजगी नाट्यगृहावर अवलंबून रहावे लागत आहे. खाजगी नाट्यगृहांची आसन क्षमता खूपच कमी असून, यामुळे नाटकाचे प्रयोग हाऊसफुल झाले तरी व्यावसायिकांचे मात्र यात आर्थिक नुकसानच आहे.
खाजगी नाट्यगृहाच्या मर्यादाखाजगी नाट्यगृहात प्रयोग सादर करण्यात खूपच मर्यादा येतात. येथील आसन क्षमता आणि त्याबरोबरच ध्वनी, प्रकाश योजना आणि इतर सुविधाही अपुऱ्या पडतात. कमी आसन व्यवस्था आणि नाट्यनिर्मिती संस्थांनी नाटकांचे वाढविलेले बजेट यामुळे प्रयोग हाऊसफुल्ल झाला तरी तो व्यावसायिक दृष्टीने न परवडणाराच आहे.- पवन गायकवाड, नाट्य व्यावसायिक
नाट्यगृहाची उपलब्धता जिकिरीचीवर्षातून दोन-तीन व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत असल्यामुळे प्रत्येक प्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण मर्यादित आसन क्षमतेमुळे अनेक रसिक प्रयोगापासून वंचित राहतात. पूर्वी शहरात वर्षभरात तीस ते चाळीस व्यावसायिक नाटके व्हायची, ते प्रमाण आता अवघ्या दोन- तीन नाटकांवर आले आहे. मनपाची दोन्ही नाट्यगृहे बंद असल्यामुळे खाजगी नाट्यगृहांमध्यो होणाºया कार्यक्रमांचे प्रमाण वाढले असून नाट्यगृहाची उपलब्धता आणि कलाकारांच्या तारखा यांचा मेळ घालणेही मोठे जिकीरीचे ठरते आहे.- राजू परदेशी, नाट्य व्यावसायिक