छत्रपती संभाजीनगर : मोबाईलवर पार्ट टाईम जाॅबसाठी आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करून माहिती भरली. त्यानंतर सायबर भामट्यांने युट्युब लिंक क्लिक केल्यास ३० रुपये प्रमाणे रक्कम मिळेल. त्यानंतर दुसरे अमिष दाखविले. अशी वेगवेगळी अमिषे दाखविल्यामुळे प्राध्यापक फसत गेले आणि शेवटी ४ लाख ८८ हजार रुपये गमावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुजरातचा सायबर भामटा राजेंद्र रमेशभाई परमार याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रियाझुद्दीन शमशुद्दीन कुरैशी (रा. वाहेद कॉलनी, रोशनगेट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना १ मार्च रोजी गुजरातमधील राजेंद्र परमार याचा व्हाटस्अपवर पार्टटाईम जॉबसाठी मेसेज आला. त्यानुसार त्यांनी फोन केल्यानंतर सायबर भामट्यांनी एक लिंक पाठवली. त्यावर माहिती भरण्यास सांगितले. त्यासाठी किरकोळ शुल्क भरण्यास सांगितले. हे शुल्क भरल्यानंतर युट्युब लिंकवर एकदा क्लिक केल्यास ३० रुपये प्रमाणे पैसे मिळतील.
त्यानुसार लिंकवर क्लिक करणे, लाईक व शेअर केले. तेव्हा १००, २५० रुपये कमीशन पाठविले. त्यामुळे विश्वास बसला. त्यानंतर दुसरा टास्क दिला. त्यानुसार १२ हजार टाकल्यास १५ हजार परत पाठविले. त्यानंतर जास्त पैसे टाकण्यास सांगितले. त्यानंतर तब्बल वेगवेगळ्या खात्यावरून तब्बल ४ लाख ८८ हजार रुपये पाठविण्यात आल्याचे डॉ. कुरैशी यांनी फिर्यादी म्हटले आहे. या प्रकरणात सुरुवातीला डॉ. कुरेशी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सायबर भामट्यांनी ज्या बँक खात्यात पैसे पाठविण्यात आले. त्या खात्यातुन पैसे वळते करीत दुसऱ्या खात्यात पाठविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक अशोक भंडारे करीत आहेत.