औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांनी नियमबाह्यपणे निलंबित केले आहे. याविरोधात प्राध्यापक संघटनांनी डॉ. पाथ्रीकर यांची मान्यता रद्द करण्यासह महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यासाठी जोरदार निदर्शने केली.
विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर बामुक्टो, बामुक्टा, एसएफआय आणि मुप्टा संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. बदनापूर येथील महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शरोफोद्दीन शेख यांच्या अधिसभेची निवडणूक लढविण्यासाठी असलेल्या अर्जावर उपप्राचार्य प्रा. महेश उंडेगावकर यांनी स्वाक्षरी केली. या दोन्ही प्राध्यापकांवर बोगस स्वाक्षरी केल्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, तसेच त्यांना निलंबित करण्यात आले. या गुन्ह्याच्या विरोधात संबंधित प्राध्यापकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. याठिकाणी निकाल प्राध्यापकांच्या बाजूने लागला असून, त्यांच्याविरोधात असलेले गुन्हे रद्द करण्यात आले.
यामुळे प्राध्यापकांना पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले असताना प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांनी रुजू करून घेतले नाही. याविरोधात वारंवार निवेदने देऊनही न्याय मिळत नाही. यामुळे प्राचार्यांची मान्यता तात्काळ रद्द करणे आणि महाविद्यालयांवर प्रशासक नेमण्याची मागणी प्राध्यापक संघटनांनी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी बामुक्टोचे अध्यक्ष डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, सचिव डॉ. विक्रम खिलारे, जिल्हाध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड, डॉ. शफी शेख, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. संजय कांबळे, डॉ. सुजात कादरी, बामुक्टाचे डॉ. संदीप पाटील, मुप्टाचे प्रा. सुनील मगरे, एसएफआयचे लोकेश कांबळे, प्राजक्ता शेटे यांच्यासह शेकडो प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
घोषणाबाजीने परिसर दणाणलाविद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर संघटनांतर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या कचखाऊ भूमिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. बप्पासाहेब म्हस्के, प्रा. सुनील मगरे, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. संजय कांबळे, डॉ. मारोती तेगमपुरे आदींनी मनोगत व्यक्त करताना प्रकुलगुरूंवर टीका केली.