सोयगाव : मनरेगाच्या संकेतस्थळावर अनुदान देयक नोंदविण्याकरिता २ हजारांची लाच घेणाऱ्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. राहुल श्रीरंग पवार ( ३५ ) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई सोयगाव पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये विहिरीचे 1,29,622/- रुपये अनुदान मंजूर झाले होते. याचे देयक संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदविणे करिता तक्रारदार कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल श्रीरंग पवार याने २ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याऔरंगाबाद येथील पथकाने याची शहानिशा करून सापळा रचला. शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात पवार याने तक्रारदाराकडून २ हजाराची लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. आरोपी पवार याच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत करून गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सोयगावमधील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे,अप्पर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पो.ना. सुनील पाटील, पो.अ.केवलसिंग घुसिंगे,विलास चव्हाण चालक चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने केली.