लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे़ येलदरी धरणात ६ दलघमी पाणी वाढले आहे़ तर निम्न दूधना प्रकल्पामध्ये १८ दलघमी पाणी वाढले आहे़ पाथरी तालुक्यातील ढालेगावचा बंधारा १०० टक्के भरल्याने तीन गेट उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे़ एकंदर पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अल्प:शी वाढ झाल्याने पाण्याचा प्रश्न शिथिल झाला आहे़परभणी जिल्ह्यात येलदरी, निम्न दूधना हे दोन मुख्य प्रकल्प असून, गंगाखेड तालुक्यातील मासोळी आणि जिंतूर तालुक्यातील करपरा हे मध्यम प्रकल्प आहेत़ भर पावसाळ्यात केवळ निम्न दूधना प्रकल्पांमध्येच पाणीसाठा शिल्लक होता़ येलदरी प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी २५ दलघमी एवढा जीवंत पाणीसाठा उपलब्ध होता़ त्यात ६ दलघमीची वाढ झाली असून, आता येलदरी धरणात ३१ दलघमी जीवंत पाणीसाठा झाला आहे़ धरणात सध्या ३़८३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ तर निम्न दूधना प्रकल्पामध्ये १८ दलघमी पाणीसाठा वाढला आहे़ शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे़ सध्या या प्रकल्पात २०१़४०० दलघमी पाणीसाठा झाला असून, त्याची टक्केवारी ५८ टक्के एवढी आहे़ यात ९८़८०० दलघमी (४० टक्के) जीवंत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ झरी येथील प्रकल्पामध्ये ९८ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे़ करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ५़६९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला असून, आता या प्रकल्पात २३ टक्के पाणी जमा झाले आहे़ तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पात १़८४३ दलघमी (७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे़ मुळीच्या बंधाºयातही ६ टक्के पाणीसाठा झाला आहे़ दोन दिवसांपूर्वी यातील अनेक प्रकल्प कोरडेठाक होते़ दोन दिवसांच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आगामी काळातील पाण्याची चिंता दूर झाली आहे़शनिवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली़ तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा पाऊस दाखल झाला असून, शेती पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी हा पाऊस समाधानकारक ठरत आहे़ सोमवारी देखील जिल्हाभरात पावसाची रिपरिप सुरू होती़ सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते़ जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला़ या पावसामुळे गोदावरी, पूर्णा, दूधना या तिन्ही नद्या प्रथमच प्रवाही झाल्या़ परभणी शहराजवळून वाहणाºया पिंगळगड नाल्यालाही पूर आला होता़ सोमवारी देखील या नाल्याचे पाणी वाढलेलेच होते़ त्यामुळे कृषी विद्यापीठ परिसरातून जाणाºया रस्त्यावरील वाहतूक सोमवारीही ठप्प पडलेली होती़प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील ३८ मंडळांमध्ये दमदार पाऊस झाला आहे़ पालम तालुक्यातील चाटोरी या एकमेव मंडळात केवळ २ मिमी पाऊस झाला़ त्या खालोखाल पालम तालुक्यातील बनवस मंडळात १४, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव मंडळात १४, माखणीत १५ मिमी पाऊस झाला आहे़परभणी शहर परिसरात ३५, ग्रामीण मंडळात ४९, सिंगणापूर मंडळात ४८, दैठणा ५९, झरी ४८, पेडगाव ५१, पिंगळी २६ तर जांब मंडळामध्ये ४९ मिमी पाऊस झाला़ पूर्णा तालुक्यात पूर्णा मंडळात ४७, ताडकळस ५६, चुडावा ८०, लिमला ६२ तर कात्नेश्वर मंडळात ३५ मिमी पाऊस झाला आहे़ सोनपेठ तालुक्यात सोनपेठ मंडळात ४६ तर आवलगाव मंडळात ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
प्रकल्पांमध्ये वाढला जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:26 AM