मागील वर्षीप्रमाणे यावर्षीचा मदर्स डेदेखील कोरोनाच्या छायेखालीच साजरा होत आहे. मात्र, यावर्षी मदर्स डेनिमित्त समोर आलेले कटू वास्तव म्हणजे अनेक मातांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे आपले मातृत्व पुढे ढकलावे लागत आहे. याचा सर्वांत मोठा परिणाम व्यंध्यत्व निवारणासाठी उपचार घेणाऱ्या महिलांवर झाला आहे. नैसर्गिक पद्धतीने अपत्यप्राप्ती होत नसल्याने उदासीन असलेल्या या महिला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणखीनच हताश झाल्या आहेत.
चौकट :
उपचारासाठी येणाऱ्या महिला नगण्य
वंध्यत्वामुळे मातृसुखापासून वंचित असलेल्या महिलांना काही महिने नियमितपणे दवाखान्यात येऊन उपचार घ्यावे लागतात. कोरोनामुळे वंध्यत्व निवारणासाठी दवाखान्यात येणाऱ्या महिलांचे प्रमाण मागील काही महिन्यांपासून नगण्य झाले आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अजूनही बहुतांश महिलांना नाही. त्यामुळे अशा असुरक्षित वातावरणात कशाला दवाखान्यात जायचे, असे सांगून महिलांना कुटुंबियांकडून घरीच थांबविले जात आहे. परिणामी, अशा महिलांचे मातृत्वाचे स्वप्न आणखी लांबते आहे.
-डॉ. श्रीनिवास गडप्पा
स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी
चौकट :
यामुळे लांबतेय मातृत्व
- कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक उत्पन्न थांबले आहे. अशामध्ये बाळाची जबाबदारी नको म्हणून काही जोडपी बाळ होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत.
- गरोदरपण म्हणजे नियमित दवाखाना. कोरोनाकाळात कशाला दवाखान्यात जाण्याची जोखीम घ्यायची आणि स्वत:सह सगळ्या कुटुंबीयांचाच जीव धोक्यात घालायचा, म्हणूनही मातृत्व पुढे ढकलले जात आहे.
- वंध्यत्व निवारणासाठीचे खाजगी रुग्णालयांमधीले उपचार महागडे असतात. त्यामुळे सध्या हा खर्च उचलणे अनेकांसाठी अशक्य झाल्यानेही अनेक जोडप्यांनी अर्ध्यावरतीच उपचार थांबविले असल्याचे खाजगी आयव्हीएफ सेंटरमधील डॉक्टरांनी सांगितले.
- वंध्यत्व निवारणासाठीचे खाजगी रुग्णालयांमधील उपचार महागडे असतात. त्यामुळे सध्या हा खर्च उचलणे अनेकांसाठी अशक्य झाल्यानेही अनेक जोडप्यांनी अर्ध्यावरच उपचार थांबविले असल्याचे खाजगी आयव्हीएफ सेंटरमधील डॉक्टरांनी सांगितले.