औरंगाबाद : खऱ्या अर्थाने व्यापारी मतदारसंघातील चुरशीच्या लढाईमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गाजली. आता आपल्याच पॅनलचा सभापती व्हावा, यासाठी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांकडून २ व्यापारी संचालकांना ‘गळ’ घालणे सुरू झाले आहे. सोमवारी निवडून आल्यापासून विविध नेते या नवनिर्वाचित व्यापाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. आज मंगळवारीही अनेक राजकीय नेत्यांच्या गाड्या जुन्या मोंढ्यात पाहावयास मिळाल्या. प्रत्यक्ष व्यापारी प्रतिनिधींची भेट घेऊन नेत्यांनी हळूच पाठिंब्याच्या विषयाला हात घातला. दोन्ही पक्षांचे नेते ‘हात’ जोडून उभे असल्याने कोणाला ‘साथ’ द्यावी, यासाठी जोरदार खलबते सुरू झाले आहेत. जुन्या मोंढ्यातील व्यापारी प्रशांत सोकिया व हरिशंकर दायमा हे दोघे जण बाजार समिती निवडणुकीत जिंकले आणि व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा राजकारण्यांचा दृष्टिकोनच बदलून गेला. एरव्ही हे दोघे व्यापारी आपल्या व्यवसायात मग्न असल्याने त्यांची ‘राजकीय’ क्षेत्राशी फारशी नाळ जुळलेली नव्हती. मात्र, बहुमताने विजयी झाल्याने हे दोघे व्यापारी राजकीय वर्तुळात हीरो बनले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या ‘सहकारी संस्था विकास पॅनल’ला पाठिंबा द्यावा, यासाठी भाजपच्या नेत्यांनी सोमवारी दुपारपासून व्यापाऱ्यांशी सतत संपर्क ठेवला आहे. माजी आ. कल्याण काळे यांचा ‘शेतकरी सहकारी विकास पॅनल’ला सभापतीपदापर्यंत पोहोचविण्यासाठी या दोन व्यापारी संचालकांनी सहकार्य करावे, यासाठी काळेंसह काँग्रेसच्या नेत्यांनीही संपर्क साधला आहे. काल भाजपचे आमदार, माजी आमदार व पक्षातील अन्य नेत्यांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. एवढेच नव्हे तर आनंदोत्सवातही सहभागी झाले. एवढेच नव्हे तर सभापती बनण्यास इच्छुक असलेले नवनिर्वाचित संचालकही सोमवारी सायंकाळी मोंढ्यातच ठाण मांडून बसले होते. आजही दिवसभर अनेक नेते येऊन सोकिया व दायमा यांना भेटून गेले. याशिवाय अन्य ओळखीच्या व्यापाऱ्यांना भेटून पाठिंब्यासाठी दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘जे पॅनल आमच्या मागण्या मान्य करील त्यास आम्ही पाठिंबा देऊ; पण त्या आधी मोंढ्यातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती व्यापारी संजय कांकरिया यांनी दिली.
जुन्या मोंढ्यात पुढाऱ्यांची वर्दळ
By admin | Published: July 15, 2015 12:33 AM