औरंगाबाद : महापालिकेच्या मुख्यलेखाधिकारी या पदावर लेखाधिकारी संजय पवार यांना दिलेली पदोन्नती राज्यशासनाने नियमबाह्य ठरविली आहे. हे पद शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भरायचे असताना मुख्यलेखाधिकारी पदावर कोणत्या नियमानुसार पदोन्नती दिली, अशी विचारणा नगर विकास विभागाने मनपा प्रशासनाला केली आहे.
याविषयी पदोन्नतीचा अभिप्राय सादर करावा, असे आदेश शासनाने प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना दिले आहेत. महापालिकेचे प्रशासक पाण्डेय यांनी काही अधिकाऱ्यांना पदोन्नत्या दिल्या. त्यात लेखाधिकारी संजय पवार यांना ३० एप्रिल २०२१ ला मुख्यलेखाधिकारी पदावर काही अटींच्या आधारे पदोन्नती दिली होती. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी मनपा प्रशासकांना या पदोन्नतीबाबत पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शासन अधिसूचना २३ मे २०१८ मधील तरतुदीनुसार मुख्यलेखाधिकारी हे पद उपसंचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या संवर्गातील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्याविषयी अधिसूचित करण्यात आलेले असताना मुख्यलेखाधिकारी या पदावर पवार यांची पदोन्नतीने नियुक्ती केलेली आहे. पालिकेच्या निवड समितीने केलेली शिफारस व त्यानुसार देण्यात आलेली पदोन्नती नियमांत बसत नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने मागविला अभिप्राय
मुख्यलेखाधिकारी पदावर शासनामार्फत प्रतिनियुक्तीने भरल्या जाणाऱ्या पदावर पवार यांना दिलेली पदोन्नती कोणत्या नियमानुसार केली, याबाबतचा अभिप्राय सादर करावा, असे पत्रात नमूद आहे. उपायुक्त रवींद्र निकम यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती देण्याचा ठराव मंजुरीसाठी शासनाकडे यापूर्वी पाठविला होता. पण, ते या पदासाठी पात्र नसल्याचे शासनाने पालिकेला कळविले आहे. त्यानंतर पवार यांची पदोन्नतीदेखील नियमबाह्य ठरविण्यात आली आहे. अजून किती जणांना पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत आणि त्याबाबत शासन काय निर्णय घेणार, हे सांगता येत नाही.