औरंगाबाद : पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्या औरंगाबादेतील घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी झडती घेतली. या झडतीत सुमारे तीनशे ग्रॅमचे सोन्याचे दागिने, बँकेशी कागदपत्रे,विविध मालमत्तांचे कागदपत्रे हाती लागल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती अशी की, बीड येथील अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांना दोन दिवसापूर्वी पाच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. बीड येथे बदली होण्यापूर्वी कांबळे हे अनेक वर्ष औरंगाबादेत निवडणुक अधिकारी म्हणून कार्यरत होते. शहरातील झांबड इस्टेट परिसरात कांबळे यांचा ‘आई ’नावाचा बंगला आहे.
या बंगल्याची लाच लचुपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी पंचासमक्ष धाड मारली. त्यावेळी बंगल्यात कांबळे यांची पत्नी आणि अन्य नातेवाईक होते. त्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी दुपारी एक वाजेपर्यंत झडती घेतली. या झडतीत दैनंदिन वापरायचे सुमारे ३० तोळयाचे दागिने, बँक ठेवी, विविध पासबूक आणि विविध मालमत्तांची कागदपत्रे आढळले,अशी माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय कांबळे यांच्या बीड आणि नांदेड येथील घराचीही पोलिसांनी आज झडती घेतल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.