औरंगाबाद : एमबीबीएस नंतरचे डिप्लोमा अभ्यासक्रम हे पीजी (एमडी, एमएस) मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व भारतीय वैद्यकीय परिषदेने देशभरातील विविध महाविद्यालयांमधील जागांचा तपशील मागविला आहे. त्यानुसार औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या एकूण २३ जागा पदव्युत्तर पदवीत रूपांतरित करण्याचा प्रस्ताव नुकताच सादर करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) क्लिनिकल विषयांच्या पदविका अभ्यासक्रमांना पूरक मनुष्यबळ असल्याने त्या विषयांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. बालरोग विभाग ७, स्त्रीरोग विभाग १४, नेत्ररोग ६, कान, नाक, घसा ३, अस्थिव्यंगोपचार ७, तर या विभागांत पदविकेच्या अनुक्रमे २, ५, २, १, २ अशा जागा आहेत. या विभागातील एमसीआय मानांकनानुसार युनिटनिहाय आवश्यक वैद्यकीय शिक्षकांची पूर्तता असल्याने या जागा पीजीत रूपांतरित होऊ शकतात. तर पॅथॉलॉजी ६, फॉरेन्सिक मेडिसीन १, अनेस्थेशिया १४, रेडिओलॉजी १३, या विषयांत विद्यापीठाशी संलग्नित पीएच.डी. मार्गदर्शक असल्याने अनुक्रमे ४, २, ३, २ जागांचाही प्रस्ताव घाटी प्रशासनाचे सीईटी सेलचे एस. बी. गोरे यांनी दिल्लीत हस्ते पोच केल्याची माहिती डॉ. सिराज बेग यांनी दिली. सध्या घाटीत पदव्युत्तर पदवीच्या १३७ तर २३ पदविकेच्या जागा आहेत. भविष्यात या जागा १६० होतील, अशी अपेक्षा आहे.
एमसीआयच्या मानांकनासाठी प्राध्यापकांना पदोन्नतीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांच्या जागा रिक्त होत्या. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनाची पूर्तता करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात ४ सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक तर ८ सहायक प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापकपदी तदर्थ पदोन्नती देण्यात आली. सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रभा मोरे-खैरे, डॉ. प्रभाकर जिरवनकर, डॉ. अविनाश लांब यांना पदोन्नतीने प्राध्यापक करण्यात आले. तर सहायक प्राध्यापक डॉ. ममता मुळे, डॉ. कैलास चितळे, डॉ. अतुल पाटील, डॉ. शिल्पा पवार यांना सहयोगी प्राध्यापकाची पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे एमसीआयच्या मानांकनाची पूर्तता व पीजी कनेक्टिव्हिटी वाढविण्यास मदत होणार आहे. १८० दिवसांसाठी असलेली पदोन्नती केवळ शैक्षणिक उपयोगासाठी असून त्याचा कोणताही आर्थिक लाभ या पदोन्नती मिळालेल्या डॉक्टरांना होणार नाही, असे कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.