- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात अन्य रुग्णसेवा थांबवून केवळ कोरोनाचे उपचार करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती ओळखून प्रत्येक जिल्ह्यात आगामी काळात संसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
शहरात चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे ३० मार्चपासून पूर्णपणे कोरोना रुग्णालयात रुपांतरित झाले. ही परिस्थिती अन्य शहरांतही पाहायला मिळत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले जात आहे.
कोरोनाची चर्चा सुरू झाली की, सध्या पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाचे नाव घेतले जाते. हे रुग्णालय सव्वाशे वर्षांहून अधिक काळ विविध संसर्गजन्य आजारांचा समर्थपणे मुकाबला करीत आहे. प्लेग, देवी, कॉलरा, इन्फ्ल्युएन्झा, पोलिओ या सध्या हद्दपार झालेल्या आणि स्वाइन फ्लू , बर्ड फ्लू, सार्स, इबोला, निपाह आणि कोरोना या संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करीत हे रुग्णालय नागरिकांच्या दिमतीला उभे आहे; परंतु अन्य शहरांत अशा रुग्णालयांचा अभाव आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज समोर आली आहे. स्वतंत्र रुग्णालयामुळे संसर्गजन्य आजारांवरील उपचार आणि प्रतिबंधाला योजनाबद्ध स्वरूप देणे शक्य होईल. संसर्गजन्य उपचारांची व्यवस्था एका छताखाली येईल.
कोरोनाच्या नियंत्रणानंतर प्रस्ताव : प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य रोगासाठी रुग्णालय प्रस्तावित करण्यात येत आहे. औरंगाबादचाही त्यात समावेश असेल. कोरोनाच्या उपचारासाठी सज्ज करण्यात आलेल्या इमारती आणि जेथे खाटा, व्हेंटिलेटर, आॅक्सिजनसह अन्य यंत्रणा आहे, त्याचे रूपांतर कोरोनाच्या नियंत्रणानंतर संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयात करावे, असे प्रस्तावित केले जाईल.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक