वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगर १ चा विकास करुनही उर्वरित भागाच्या विकासात अनेक अडथळे येत असल्याने हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. अवाढव्य किंमतीमुळे सिडकोच्या महानगर ४ मधील भूखंडाला ग्राहक मिळत नसल्याने अनेक भूखंड तसेच पडून आहेत. या संबंधीचा दर कमी करण्याचा पाठविलेला प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयात वर्षभरापासून धूळखात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सिडकोने वाळूज औद्योगिक परिसरातील निवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी दोन दशकांपूर्वी शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या. प्रशासनाने आत्तापर्यंत सिडको वाळूज महानगर महानगर १ वगळता उर्वरित फेजचा म्हणावा तसा विकास केलेला नाही. विकासाची गती मंदावल्यामुळे महानगर ३ चा विकास करण्यापूर्वीच या भागात नागरी वसाहती अस्तित्वात आल्याने हा प्रकल्पच प्रशासनाला रद्द करावा लागला. त्यामुळे सिडकोने महानगर ४ विकसित करण्याचा निर्णय घेतला. महानगर ४ मध्ये मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण करीत या ठिकाणी प्लॉटिंग केली आहे. त्या अनुषंगाने या भागात सिडकोने निवासी व व्यवसायिक असे ३६३ भूखंडाची आखणी केली आहे. या भूखंडाची विक्री करण्यासाठी प्रशासनाने २०१७ मध्ये निविदाही काढली. परंतू बाजार भावापेक्षा हे दर अधिक असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब लक्षात येताच प्रशासनाने भूखंडाचे दर कमी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप निर्णय आलेला नाही. हा प्रस्ताव वर्षभरापासून वरिष्ठ कार्यालयात धूळखात असल्याने महानगर ४ मधील भूखंडही गिºहाईका अभावी तसेच पडून आहेत. परिणमी महानगर ४ चा विकास रखडला आहे.
या विषयी सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महानगर ४ मधील भूखंडाच्या किंमती जास्त असल्याने निविदा काढूनही भूखंडाची विक्री झाली नाही. दर कमी करण्या संदर्भात वरिष्ठांना प्रस्ताव पाठविला आहे. दर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करित आहोत, असे लोकमतशी बोलताना सांगितले.