पाथरी : गोपेगावला जाणारा रस्ता गेल्या दहा वर्षांपासून नादुरुस्त असल्याने रस्ता दुरस्त करावा, यासाठी आता येथील ग्रामस्थांनी चक्क विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला़ निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात प्रवेशास बंदी घातली आहे़ तसेच आता तसा बोर्डही गावाच्या दर्शनी ठिकाणी लावण्यात आला आहे़ त्यामुळे पुढारी या गावाकडे जाण्यासाठी धास्ती घेत आहेत़ पाथरी तालुक्यातील गोपेगाव या गावाला पाथरी-वडी या मार्गे जावे लागते़ वडी - गोपेगाव हा पाच किमी रस्ता नादुरुस्त आहे़ रस्ता अत्यंत खराब झाल्याने गावाला बसही नाही़ दुचाकी वाहनेसुद्धा या रस्त्यावरून चालविणे अवघड झाले आहे़ रस्ता दुरुस्तीसाठी येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे उंबरठे झिजविले़ परंतु, गोपेगावच्या रस्त्याचा प्रश्न कधी मार्गीच लागला नाही़निवडणुकीच्या काळात मात्र विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी आता या गावाकडे प्रचारासाठी फिरू लागले आहेत़ रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी गावातच बैठक घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला़ तशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी पाथरी यांना देण्यात आले़ या निर्णयानंतर २३ सप्टेंबरपासून पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ याबाबतचा मोठा बोर्ड गावाच्या दर्शनी ठिकाणी लावून पुढाऱ्यांना गावात आल्यास रस्त्यातच अडविण्याबाबत नागरिक सतर्क झाले आहेत़ उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर कल्याण गिराम, पंढरीनाथ गिराम, दादाराव गिराम, शिवाजी गिराम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (वार्ताहर)
गोपेगावात पुढाऱ्यांना गावबंदी
By admin | Published: September 23, 2014 11:26 PM