औरंगाबाद : शिवाजीनगर ते देवळाई चौक दरम्यान असलेल्या रेल्वे फटकामुळे रहिवाशांना अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तेथे भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, मात्र अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने जनतेचा त्रास जैसे थे आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथे भुयारी रेल्वे मार्ग करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज सकाळी सुमारे तासभर जोरदार निदर्शने करण्यात आली.
शहरातील नागरिकांना देवळाई चौक, बीड बायपासकडे जाण्यासाठी शिवाजीनगर रेल्वे रुळावरून ये- जा करावी लागते. शिवाजीनगर येथील या मार्गावर रेल्वेचे फाटक आहे. दर अर्धा तासाला रेल्वे गाडी, मालगाडी ची ये -जाय चालू असते. यामुळे शिवाजीनगर येथील हे फाटक बंद केल्या जाते. फाटक बंद होताच या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही वाहन चालक जीव धोक्यात घालून फाटका खालून घुसतात. बऱ्याचदा घाई घाईने रोडवरून जाताना अनेकांना दुखापत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
फाटक बंद होताच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. वाहन चालक कर्कश हॉर्न वाजवतात यामुळे परिसरातील रहिवासी आणि दुकानदार नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाजीनगर येथील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे .केवळ भूसंपादन रखडल्याने हा भुयारी मार्ग आतापर्यंत होऊ शकला नाही. पालकमंत्री महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे या भुयारी मार्गासाठी निधी उपलब्ध करावा आणि जनतेला या त्रासातून मुक्त करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेवतीने बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे निदर्शने करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी हातात गाजरे घेऊन प्रशासन जनतेला केवळ खोटी आश्वासन देत आहे, असे नमूद करून जोरदार आंदोलन केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यात अनिकेत निलावार, राजू जावळीकर, लीला राजपूत, हेमंत जाधव, शिवम बोराडे, गणेश निकम, मोनू तुसे, प्रशांत जोशी, गणेश सोळुंके, अण्णा मगरे, विशाल आहेर आदींनी सहभाग नोंदविला.