लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : झालर क्षेत्रातील मांडकी येथील शेतक-यांनी शुक्रवारपासून नारेगाव येथील कचरा हटविण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी आज पहिल्याच दिवशी महापालिकेची एकही गाडी कचरा डेपोवर जाऊ दिली नाही. मनपाने त्वरित निर्णय न घेतल्यास आयुक्त, महापौरांच्या निवासस्थानी कचरा नेऊन टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.शहरातील तब्बल ४५० मेट्रिक टन कचरा टाकायचा कोठे, हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाला सकाळपासून भेडसावू लागला. सातारा-देवळाई येथील खदानीचा पर्याय शोधला; पण तेथेही मनपाची डाळ शिजली नाही. शेवटी नक्षत्रवाडीतील मनपाच्या खुल्या जागेवरच तात्पुरत्या स्वरूपात कचरा टाकण्यात आला.नारेगाव परिसरातील १३ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन शुक्रवारपासून आंदोलन छेडले आहे. आंदोलन सुरू होताच सकाळी महापौर बापू घडमोडे, आयुक्त डी.एम. मुगळीकर, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, गोकुळ मलके, जगन्नाथ काळे आदींनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या.महापौर, आयुक्तांनी आंदोलकांची समजूत घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. नारेगाव येथील कचरा त्वरित हटवा, नवीन कचरा आणून टाकू नका, या मुख्य मागणीवर आंदोलक ठाम होते. यंदा दिवाळी साजरी न करता मनपा आयुक्त, महापौरांच्या घरात कचरा आणून टाकण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.खदानीचा प्रयोगही फसलासातारा-देवळाई येथील खदानीत कचरा टाकण्याचा निर्णय मनपाने घेतला. मात्र, मनपाच्या गाड्या करीम पटेल यांनी अडविल्या. खाजगी जागेवर कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. खदानीचे मालक कोण? असा शोध घेण्यात आला. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांची ती जागा असल्याचे कळाले. परदेशी यांनी कचरा टाकण्यास विरोध दर्शविला नाही; पण हा टाकलेला कचरा कधी उचलणार ते सांगा, असा प्रश्न मनपा अधिका-यांना विचारल्यावर ते निरुत्तर झाले.रात्री उशिरा नक्षत्रवाडी भागातील नागरिकांनी तात्पुरत्या कचरा डेपोला विरोध दर्शवित जोरदार आंदोलन सुरू केले. पोलीस बंदोबस्तात महापालिका अधिका-यांना गाड्या पाठवाव्या लागल्या. हे आंदोलन अधिक चिघळणार आहे.काँग्रेसचा पाठिंबानारेगाव कचरा डेपोमुळे ३५ वर्षांपासून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. कचरा डेपो हटाव आंदोलनाला काँग्रेसचे कादर शहा, महेबूब बागवान, जुबेर शहा, जावेद पटेल, सरवदे, सुभाष हिवराळे आदींनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला.
कच-याचा फास महापालिकेच्या गळ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:26 AM