औरंगाबाद : रेल्वेस्टेशन समोरील चौकात असलेल्या जनता हॉटेल चे अतिक्रमण काढण्यास अतिक्रमणधारकांनी विरोध केल्यामुळे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागास आज माघारी परतावे लागले.
महानगर पालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तासह सकाळी दहा वाजताच रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाले होते. यावेळी अतिक्रमण धारकांनी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अनिल आडे, महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी एम बी काझी, पदनिर्दषीत अधिकारी सी. एम. अभंग यांच्याशी वाद घालत अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. हॉटेल लगत असलेले धार्मिक स्थळ हे आमचे श्रद्धास्थान असल्याने अतिक्रमण काढू नये अशी भूमिका यावेळी येथील नागरिकांनी घेतली. त्यामुळे महापालिका अतिक्रमण विभागाला येथील अतिक्रमण आज हटवता आले नाही.
अतिक्रमण धारकांना यावेळी पोलीस तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांशी वाद घालत महापौर व आयुक्तांना बोलावण्याची मागणी केली. घटनास्थळी मोठा जमाव जमा झाल्याने पोलिसांना अधिक कुमक मागावी लागली. कारवाई दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच संतप्त जमावाने मनपा पथकावर दगडफेकसुद्धा केली.