करमाड (औरंगाबाद) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवहेलना प्रकरणी पोलीस निरीक्षकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी करमाडमध्ये आज सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या आश्वासनानंतर मोर्चा थांबविण्यात आला. दोन तास चाललेल्या या निषेध मोर्चामुळे जालना रोडवरील वाहतूक खोळंबली होती.
औरंगाबाद तालुक्यातील पिंपळखुटा येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रकरणी करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले विरुद्ध आज करमाड येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. साधारण दोन तास चाललेल्या या निषेध मोर्चा व रास्ता रोकोमध्ये मोठा प्रमाणात आंदोलकांनी सहभाग घेतला होता. या मोर्चात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. मोर्चात पिंपळखुटा येथे घडलेल्या घटनेची माहिती गावातील महिला, तरुण, नागरिकांनी जाहीररित्या कथन केली. यावेळी अंकांच्या भावना दाटून आल्या. अनेक महिला व तरुणांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
कारवाईच्या आश्वासनानंतर थांबला मोर्चा करमाड येथील पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांची तात्काळ मुख्यालयी बदली करून अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी करून त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी आंदोलकांना दिल्यानंतर मोर्चा थांबविण्यात आला. या रास्तारोको दरम्यान खोळंबलेल्या वाहतुकीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकांना शिवप्रेमींनी रस्ता मोकळा करून दिला.