लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चाळीसगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी पदाधिका-यांच्या दबावाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्र विकास सेवेच्या वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिकाºयांनी जिल्हा परिषदेत दुपारपर्यंत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सर्व विभागप्रमुखांसमवेत या अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलनही केले.चाळीसगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांच्यावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नियमबाह्य कामे करण्यासाठी पदाधिका-यांनी दबाव आणला. वाघ यांनी नियमबाह्य कामे करण्यास नकार दर्शविल्यानंतर पदाधिका-यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत सभागृहाबाहेर काढले. अपमान सहन न झाल्यामुळे गटविकास अधिकारी वाघ यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची परिस्थिती अत्यवस्थ असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जबाबदार पदाधिकाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे राज्य सचिव वासुदेव सोळंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख आंदोलनात सहभागी झाले होते.दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील पाणीपुरवठा व स्वच्छतेची आढावा बैठक सुरू होती. या बैठकीत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिका-यांनी मंत्री लोणीकर व विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन सादर केले. तेव्हा लोणीकर यांनी ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांना दूरध्वनीवर संपर्क साधला व या प्रकरणाकडे त्यांचे लक्ष वेधले. निवेदन देताना उपायुक्त पारस बोथरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, रामप्रसाद लाहोटी, गटविकास अधिकारी विजय परदेशी, प्रकाश दाभाडे, संजय कुलकर्णी, आर.के. बागडे, भास्कर कुलकर्णी, नंदकुमार जाधव, ज्योती कवडदेवी, उषा मोरे, विठ्ठल हरकळ, मनोरमा गायकवाड, डॉ. ज्ञानोबा मोकाटे, व्ही.आर. पाटील, एम.सी. राठोड आदींसह मराठवाड्यातील बहुतांश गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत लेखणीबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:30 AM