- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील मराठा आंदोलकांनी निमखेडा टाकळी जिवरग रस्त्यावर आज सकाळी आंदोलन सुरू असताना अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचे भाऊ मजूर सोसायटीचे संचालक अब्दुल गफ्फार यांची गाडी अडवली. यावेळी वाहनावरील विधानसभा सदस्य असे लावलेले स्टिकर आंदोलकांनी काढायला लावले. तसेच अब्दुल गफ्फार यांना भाऊ अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला लावली.
तालुक्यातील निमखेडा टाकळी जिवरग रस्त्यावर आज सकाळी साडेअकरा वाजेच्यादरम्यान मराठा आंदोलकांनी आंदोलन केले. यावेळी यावेळी विधानसभा सदस्य असे स्टीकर दिसल्याने आंदोलकांनी मंत्री अब्दुल सत्तार मध्ये असल्याचे समजून गाडी अडविली. मात्र या गाडीमध्ये अब्दुल सत्तार नव्हते त्यांचे भाऊ अब्दुल गफ्फार होते. त्यांच्या गाडीला विधानसभा आमदार चे स्टिकर लावलेले असल्याने जमावाने त्यांच्या गाडीचे स्टिकर काढून टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर अब्दुल गफ्फार यांना आंदोलकांनी गाडी खाली उतरवले. यावेळी अब्दुल गफ्फार यांनी मी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे, असे आंदोलकांना सांगितले. तेव्हा आंदोलकांनी मग अब्दुल सत्तारांच्या विरोधात घोषणा देण्याचा आग्रह केला. यावर अब्दुल गफ्फार यांनी थेट भावाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन झालेल्या कासोद येथे लावलेल्या या सर्व पाट्याआंदोलकांनी उखडून फेकल्या. तर तालुक्यातील गव्हाली येथे सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणात तांडा बाजार येथील ७३ मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला.