औरंगाबाद : दुष्काळ निवारण संघर्ष समितीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू केले असून, आज दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी वर्गणी गोळा करीत चुलीवर स्वयंपाक करून आयुक्तालय प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.
शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि हाताला काम देण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी समितीने आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी आंदोलकांनी विभागीय प्रशासनाची भेट घेऊन गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेटण्याची वेळ घेऊन देण्याची मागणी केली. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये मुक्ताराम गव्हाणे, माधवराव निर्मळ, बाळासाहेब अलगे, सुनील शिंदे, पुरण सनान्से, समाधान सुरासे, प्रकाश वाघ, अॅड. आसाराम लहाने, यादवराव कांबळे, सुभाष वागले, जगन्नाथ काथारे, श्रीनिवास वाकनकर, उद्धव देशमुख, तसेच महिलांचा सहभाग आहे.
फायनान्स कंपन्यांकडून दमदाटी करणारी वसुली सुरू आहे, त्याला चाप बसविण्यात यावा. दिग्रस उच्चस्तर बंधाऱ्यातून पळविण्यात आलेल्या पाण्याची जायकवाडी प्रकल्पातून भरपाई करा, माजलगाव प्रकल्पासाठी वरच्या धरणातून पाणी उपलब्ध करून सोनपेठ व गंगाखेड तालुक्यातील लाभक्षेत्रास पाणीपाळ्या द्या, इसाद प्रकल्पासाठी पाणी द्या, रोजगार मागणी केलेल्या सर्व मजुरांना रोहयोची किमान २०० दिवस कामे उपलब्ध करून द्या, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी, हाताला काम आणि सर्वांना रेशन यासह दुष्काळ निवारणासाठीच्या १३ सुविधा तात्काळ अमलात आणा, ठोका, बटईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्या, वीज बिल माफ करा, आदी मागण्या समितीने निवेदनाद्वारे केल्या आहेत.