औरंगाबाद: दारू विक्रीमुळे परिसरातील महिला आणि मुलांना त्रास होतो, असे म्हणून उपोषण करणाऱ्या दोन जणांनी दुकानदारांना धमकावत १ लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर उपोषण करण्यासाठी लावलेल्या मंडपाचा खर्च म्हणून २ हजार रुपयेसुद्धा त्या दोघांनी दुकानदारांकडून उकळले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी गुन्हा नोंदविला आणि तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. दादाराव आढाव (रा . मिसरवाडी) आणि प्रकाश तुपे अशी आरोपींची नावे आहेत.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार प्रतिक देवीदास झोटे (रा. सिडको एन ८ ) आणि त्यांचा मित्र रवी नंदलाल जैस्वाल यांची सनी सेंटर रोडवर देशी दारूची वेगवेगळी दुकाने आहेत. ६ ऑक्टोबर रोजी दादाराव आढाव आणि प्रकाश तुपे यांनी त्यांना भेटून तुमच्या दारू दुकानांचा आमच्या कॉलनीतील महिला आणि मुलांना त्रास होतो, असे म्हणून त्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. विनापरवाना उपोषण असल्याने पोलिसांनी त्यांना उठवून लावले होते. उपोषण संपल्यावर दुकानदार जैस्वाल आणि झोटे यांच्याकडुन आढाव आणि तुपे याने उपोषण करण्यासाठी टाकलेल्या मंडपाचा खर्च म्हणून २ हजार रुपये घेतले.
पोलीस आयुक्तांनी दिले आदेश
यानंतर आरोपी दोन्ही दुकानदारांना सतत फोन करून दुकान चालवायचे असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतील असे म्हणून खंडणी मागू लागले. पैसे दिले नाही तर तुमच्या दुकानाविरूध्द लोकांना भडकावून आंदोलन करण्याची धमकी त्यांनी दिली. एक लाख रुपयांची खंडणीसाठी ते सतत धमकावू लागल्याने दोन दिवसांपूर्वी दुकानदारांनी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची भेट घेतली. यानंतर त्यांना आरोपीने खंडणीसाठी केलेल्या कॉलची रेकॉर्डिंग ऐकविली. हा प्रकार पाहून आयुक्तांनी याविषयी तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. झोटे यांची तक्रार नोंदवून घेत सिडको पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदविला. गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख तपास करीत आहेत.