(सोबत फोटो सोडला आहे........)
औरंगाबाद : विद्यापीठातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी पद व अधिकाराचा गैरवापर करून आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहेत. प्रामुख्याने आंबेडकरी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते, या घटनेचा निषेध करत सोमवारी आज आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली.
निदर्शनानंतर दिनकर ओंकार, संजय ठोकळ, किशोर थोरात, किशोर वाघ, डॉ. संदीप जाधव, सचिन निकम, विजय वाहुळ, प्रकाश इंगळे, डॉ. कुणाल खरात, डॉ. अरुण शिरसाठ, गुणरत्न सोनवणे, ॲड. अतुल कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेत कार्यकर्त्यांनी प्र-कुलगुरुंच्या निदर्शनात आणून दिले की, आंबेडकरी कार्यकर्ते नागराज गायकवाड यांनी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या मूळ नियुक्तीबाबत आक्षेप नोंदवून या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर ठेवावे, अशी मागणी केली होती. मात्र, मूळ प्रकरणाची चौकशी न करता नागराज गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा राग मनात ठेवून कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्यामार्फत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा. दरम्यान, यावेळी सादर केलेल्या निवेदनात आरक्षण डावलून कंत्राटी तत्त्वावर शिक्षक संवर्गातील भरलेल्या जागा तात्काळ रद्द कराव्यात, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील 'ट्रेनिंग स्कूल फॉर इंटरन्स टु पॉलिटिक्स' हा विभाग तात्काळ सुरू करावा, या व इतर मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात गौतम अमराव, लक्ष्मण हिवराळे, शिरीष कांबळे, लोकेश कांबळे, अमोल खरात, प्रा. सिद्धोधन मोरे, राहुल वडमारे, डॉ. किशोर वाघ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
कॅप्शन :
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करताना आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.