छत्रपती संभाजीनगर: अयोध्या येथे आज झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विधी करून घेण्याचा मान बीडचे पुरोहित गजानन ज्योतकर यांना मिळाला. मुख्य विधीवेळी केवळ पाच पुरोहित गाभाऱ्यात होते. यातील एक पुरोहित ज्योतकर होते. त्यांना हा मान मिळाल्याने मराठवाड्याचे नाव जगभरातील रामभक्तांमध्ये झाले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी, दुपारी १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त सुमारे ८४ सेकंदांचा होता. मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एकूण १२१ पुजार्यांच्या पथकाकडून हा विधी केला गेला. हे पथक प्राणप्रतिष्ठापूर्वीच्या विविध विधी करण्यासाठी १६ जानेवारीपासून कार्यरत होते.
दरम्यान, आज सकाळी प्राणप्रतिष्ठा मुख्य विधीवेळी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह केवळ ५ पुजारी गाभाऱ्याच्या आत उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी प्राणप्रतिष्ठा करत असताना, मोदींकडून विधी करून घेण्याचा मान बीडचे पुरोहित गजानन ज्योतकर यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने पंतप्रधान मोदी यांनी हे रामललाची विधीवत प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली. बीड तालुक्यातील कळसंबर हे २९ वर्षीय पुरोहित गजानन ज्योतकर यांचे मूळ गाव. १२ वर्ष वेद शास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील ८ वर्ष त्यांनी काशी येथील द्रविड शास्त्री यांच्याकडून ज्ञानग्रहण केले आहे.
मुख्य पुजारी दीक्षित यांचे देखील महाराष्ट्राशी नातेरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी होते. दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये राहत आहे. त्यांच्या पूर्वजांनीही नागपूर आणि नाशिक या संस्थानांत अनेक धार्मिक विधी केले. लक्ष्मीकांत दीक्षित हे मीरघाट, वाराणसी येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. काशीच्या राजाच्या मदतीने सांगवेद महाविद्यालयाची स्थापना झाली. पंडित लक्ष्मीकांत हे काशीतील यजुर्वेदाच्या उत्तम अभ्यासकांमध्ये गणले जातात. पूजेच्या पद्धतीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली. पंडित लक्ष्मीकांत यांचे पूर्वज प्रसिद्ध पंडित गागा भट्ट हे देखील आहेत, ज्यांनी १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.