औरंगाबाद : श्रीलंकेतील वासकादुवा येथे झालेल्या कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त साक्षी चितलांगे हिने महिला गटात रौप्यपदक जिंकले. श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुनावारदेना यांच्या हस्ते साक्षीला रौप्यपदक व रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कॉमनवेल्थ चेस असोसिएशनचे अध्यक्ष भरतसिंग चव्हाण उपस्थित होते. या स्पर्धेत सात देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. साक्षीने आतापर्यंत ११ आंतरराष्ट्रीय पदके मिळवली असून, कॉमनवेल्थमधील तिचे एकूण हे पाचवे पदक ठरले आहे. साक्षीने २०१५ ते २०१८ दरम्यान सलग चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
तसेच याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑनलाइन ब्रिक्स गेम्स मध्ये बुद्धिबळ स्पर्धेत साक्षीने भारतासाठी महिला गटात सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, तिने वुमन ग्रँडमास्टर टायटलसाठी आवश्यक तीन नॉर्म पूर्ण केले आहे.